डेरा सच्चा सौदाच्या राम रहीमनंतर आता राधे माँच्या अडचणीत होणार वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 05:09 PM2017-09-05T17:09:08+5:302017-09-05T17:13:10+5:30
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांना तुरुंगवास भोगावा लागल्यानंतर आता स्वतःला देवीचा अवतार समजणा-या राधे माँच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पंजाब, दि. 5 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम यांना तुरुंगवास भोगावा लागल्यानंतर आता स्वतःचा देवीचा अवतार सांगणा-या राधे माँच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये एक व्यक्तीनं राधे माँविरोधात पंजाब उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
पंजाबमधल्या फगवाडातील रहिवासी असलेल्या सुरेंद्र मित्तलनं पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करत स्वयंघोषित देवीचा अवतार सांगणा-या राधे माँच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं अपील केलं आहे. या याचिकेवर सुनावणी करत पंजाब उच्च न्यायालयानं कपूरथला पोलिसांना फटकारलं होतं. पंजाब उच्च न्यायालयानं राधे माँ विरोधात अद्यापपर्यंत एफआयआर का दाखल केलं नाही, असा सवाल विचारला आहे. सुरेंद्र मित्तल यांनी काही महिन्यांपूर्वीच राधे माँच्या विरोधात पंजाब पोलिसांत तक्रार दिली होती.
राधे माँ त्यांना रात्री-अपरात्री फोन करून त्रास देत असल्याचं त्यांनी पोलिसांनी सांगितलं होतं. पंजाब पोलिसांना या प्रकरणात 13 नोव्हेंबर रोजी पंजाब उच्च न्यायालयासमोर उत्तर द्यायचं आहे. पोलिसांनी हा गुन्हा आहे की नाही, हेसुद्धा न्यायालयासमोर स्पष्ट करायचं आहे. जर गुन्हा असल्यास अद्यापपर्यंत एफआयआर का दाखल केलं गेलं नाही, याचीही माहितीही द्यावी लागली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राधे माँच्या विरोधात तिचे गॉडफादर म्हणून ओळखले जाणा-या मनमोहन गुप्ता यांनी तक्रार दाखल केली होती. आपल्या मुलांना हाताशी धरुन राधे माँने मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप मनमोहन गुप्ता यांनी केला होता. राजवीन आणि संजीव ही मनमोहन गुप्तांची मुले राधे माँ सोबत आहेत.
गुप्ता यांनी बोरिवली पोलीस स्थानकात राधे माँ विरोधात तक्रार दाखल केली होती. मनमोहन गुप्ता यांनीच राधे माँला मुंबईत आणले होते. आपल्या नंदनवन भवन या तीन मजली इमारतीत त्यांनी राधे माँच्या निवासाची व्यवस्था केली होती. राधे माँने दोन वेगवेगळ्या नंबरवरून मला फोन केले व माझ्याच मुलांकरवी मला मारहाण करण्याची धमकी दिली होती, असे मनमोहन गुप्ता यांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले होते.
मागच्या वर्षी मनमोहन गुप्ता यांनी राधे माँ आणि आपल्या दोन मुलांना घराचा ताबा सोडण्यास सांगितले. माझी मुले राधे माँसोबत पंजाबला निघून गेली होती. कलम 507 अंतर्गत एनसी नोंदवण्यात आली असून, आरोपांची पडताळणी केल्यानंतर पोलीस एफआयआर दाखल केलं होतं. मागच्या वर्षी एका महिलेने राधे माँ विरोधात तक्रार केल्यानंतर ती अडचणीत सापडली होती. हुंडयासाठी सासरकडच्या मंडळींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप पीडित महिलेने राधे माँवर केला होता. महिलेच्या सासरकडची मंडळी राधे माँ चे भक्त होते.