नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्वच विद्यालये, तंत्रशिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरात १८ आणि त्यापेक्षा वरील वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार कॅम्पसमध्ये फलक लावून मानावेत, अशी सूचना आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी व्हॉट्सअप संदेशातून विद्यापीठांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन आठवड्यापूर्वी देशभरात २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात २१ जून रोजी देशात तब्बल 69 लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे. त्याबद्दल मोदींनी ट्विरवरुन देशवासीयांचे अभिनंदन करत वेल डन इंडिया.. असेही म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या गतीमान लसीकरण मोहिमेचे आभार मानण्याच्या सूचना विद्यापीठा अनुदान आयोगाने केल्या आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी याबाबत व्हॉटसअपवरुन विविध विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना रविवारी संदेश पाठवले आणि मोदींचे आभार व्यक्त करणारे फलक सोशल मीडियावरील शैक्षणिक संस्थांच्या वेबपेजवर प्रसिद्ध करावेत, असे सांगितले. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मान्यताप्राप्त डिझाईन हे हिंदी आणि इंग्रजी भाषेतून उपलब्ध असेल आणि ते सोशल मीडियाला जोडावे. या डिझाईनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून 'धन्यवाद पीएम मोदी' असा आशयही लिहिण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबात रजनीश जैन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही. मात्र, देशात तीन विद्यापीठांतील अधिकाऱ्यांनी आयोगाकडून ही सूचना प्राप्त झाल्याचे म्हटले आहे.