रायबरेली घराणेशाहीमुक्त करणार- अमित शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:11 AM2018-04-22T00:11:15+5:302018-04-22T00:11:15+5:30
अमित शहांची टीका; विकासाच्या मार्गावर नेण्याचा दिला शब्द
रायबरेली : गांधी कुटुंबाचा गड समजल्या जाणाऱ्या रायबरेलीत दाखल झालेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले की, आमचा पक्ष सोनिया गांधी यांच्या मतदारसंघाला घराणेशाहीपासून मुक्त करुन विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल.
येथे एका सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, रायबरेलीतून काँग्रेसचे मोठमोठे नेते निवडून आले. पण, स्वातंत्र्यानंतर येथे विकास दिसून आला नाही. फक्त घराणेशाही दिसली. रायबरेलीला घराणेशाहीपासून मुक्त करुन विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी भाजप अभियान सुरु करेल. दरम्यान, मक्का मशिद स्फोट प्रकरणात असीमानंद यांची न्यायालयाने सुटका केली आहे. याचा उल्लेख करुन शहा म्हणाले की, राहुल गांधी यांना मी सांगू इच्छितो की, त्यांच्या नेत्यांनी भगवा दहशतवादाचा शब्दप्रयोग करुन हिंदूंना बदनाम करण्याचे जे काम केले आहे त्यासाठी देशाची माफी मागावी.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होईल, असा दावा करुन शहा म्हणाले की, २०१९ मध्ये देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच सरकार बनणार आहे. तत्पूर्वी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भाजप एखाद्या कुटुंबाचा वा जातीचा पक्ष नाही. भाजप सत्तेत आल्यानंतर देशात गरीबांचा विकास झाला आहे.
घटनास्थळी लागली आग
या सभेत शहा यांचे भाषण सुरु होण्यापूर्वीच आग लागल्यामुळे धावपळ उडाली. अधिकाºयांनी सांगितले की, या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यात आले. मीडियासाठी तयार करण्यात आलेल्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व्यासपीठावर होते.