नवी दिल्ली : राफेल विमाने खरेदीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा केली. राफेल व्यवहारासंदर्भातील कॅगचा अहवाल संसदीय लेखा समितीसमोर ठेवण्यात आला होता असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात म्हटले आहे. मात्र या समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला नव्हता असा गौप्यस्फोटही राहुल यांनी केला. त्याला समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही दुजोरा दिला.राफेलसंबंधीच्या निकालानंतर राहुल गांधी म्हणाले की, प्रत्येक राफेल विमानाची किंमत ५२६ कोटी रुपयांवरून १६०० कोटी रुपयांपर्यंत का वाढविण्यात आला, हा आमचा मुख्य प्रश्न आहे. या व्यवहारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानीला मदत केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला या व्यवहारातून बाजूला काढून अनिल अंबानी यांच्या कंपनीला भागीदार बनवावे, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनीच दिल्याचे फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी म्हटले होते.राफेल व्यवहाराबाबत फ्रान्समध्ये नेमके काय झाले याची आपल्याला माहिती नसल्याचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सांगितले होते, असे राहुल गांधी म्हणाले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेच क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करण्याचे कारण नाही. तशी समिती नेमली जाणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.राहुल व त्यांच्या शिलेदारांनी माफी मागावी -अमित शहानवी दिल्ली : राफेल विमाने खरेदी व्यवहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावणे ही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या खोटारड्या राजकारणाला मिळालेली सणसणीत चपराक असून, राहुल व त्यांच्या शिलेदारांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली.ते म्हणाले की, राफेल व्यवहारप्रकरणी चुकीची माहिती पसरवून राहुल गांधींनी राबविलेल्या प्रचार मोहिमेचे पितळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उघडे पडले आहे. राफेलच्या मुद्याबाबत काँग्रेसने संसदेत चर्चा केली पाहिजे. भाजपाही त्यासाठी तयार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सत्याचा विजय झाला आहे. देशाच्या चौकीदाराला चोर म्हणणारेच चोर निघाले, असा चिमटाही शहा यांनी राहुल गांधी यांना काढला.हा विषय लोकांमध्ये नेऊ : शिंदेराफेल व्यवहारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला क्लीन चिट दिली, याचा अर्थ आमची पीछेहाट झाली, असा होत नाही. या व्यवहाराचा मुद्दा अजूनही जनतेच्या दरबारात चर्चिला जात आहे. राफेल प्रकरण काँग्रेस संसदेतही उपस्थित करीत राहाणारच, असे काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे.व्यवहारांत सुधारणा करा : मायावतीसंरक्षण व्यवहारांच्या पद्धतीत मूलभूत सुधारणा करण्यात याव्यात, असे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मोदी सरकारला थोडासा दिलासा नक्कीच मिळाला असेल. संरक्षण खात्यातील व्यवहारांवरून भाजपा व काँग्रेस दोघांवरही आरोप झाल्याने जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे.नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले, राफेल व्यवहार हा निवडणूक प्रचारातील मुद्दा म्हणून कसा काय उरू शकतो? राफेलचा लढा देण्याचे न्यायालय हे योग्य ठिकाण नाही. काही लढाया या राजकीय रिंगणातच व्हायला हव्यात, असेही ते म्हणाले.अनिल अंबानींनी केले निकालाचे स्वागतसुप्रीम कोर्टाने राफेलच्या आॅफसेट करारात काही गैर नसल्याचे म्हटल्याने अनिल अंबानी यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने केलेले सर्वच आरोप चुकीचे होते, हे या निर्णयाने स्पष्टच झाले आहे. आपणावर केलेले आरोप राजकीय हेतूने केले होते.संसदेचे कामकाम दिवसभरासाठी तहकूबसंसदेचे अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्ष व त्यातही प्रामुख्याने काँग्रेसचे सदस्य राफेल व्यवहारावर चौकशीची मागणी करीत असल्याने कामकाज स्थगित होत होते.शुक्रवारी मात्र सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहारात काही अनियमितता नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपा सदस्यांनीच राहुल गांधी यांनी आरोपांबाबत माफी मागावी, अशी मागणी करीत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्वत:च काँग्रेसवर हल्ला चढवताना, काँग्रेसने राजकीय स्वार्थासाठी आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.आम्ही बुडालो, तर तुम्हाला घेऊ न बुडू या प्रकारे काँग्रेसचे नेते वागत होते, अशी टीका राजनाथसिंह यांनी केल्यानंतर भाजपाचे सारेच सदस्य उभे राहून काँग्रेस व राहुल गांधींविरुद्ध घोषणा देऊ लागले.
Rafale Deal: संसदीय समितीमार्फतच राफेलची चौकशी करा; राहुल गांधी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 5:23 AM