Rafale Deal: राहुल गांधी साधणार HALच्या कर्मचाऱ्यांशी संवाद; जाणून घेणार राफेल करारानंतरचे 'हाल'हवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 05:20 PM2018-10-10T17:20:25+5:302018-10-10T17:27:10+5:30
राफेल मुद्यावरुन पुन्हा एकदा साधणार मोदींवर निशाणा
नवी दिल्ली: राफेल डील वरुन सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला झटका दिला आहे. राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेची माहिती देण्याचे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या या धक्क्यानंतर काँग्रेसनं राफेल मुद्यावरुन सरकारची आणखी कोंडी करण्याची योजना आखली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राफेल करारात अंबानीच्या कंपनीला सामावून घेत मोदींनी हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीवर अन्याय केला, अशी टीका राहुल यांनी वारंवार केली आहे.
13 ऑक्टोबरला राहुल गांधी कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये कँडल मार्च काढणार आहेत. काँग्रेस कार्यालयापासून सुरू होणारा हा मोर्चा हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या कार्यालयाजवळ संपेल. यानंतर राहुल गांधी हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. काँग्रेस नेते जयपाल रेड्डी यांनी या मोर्चाबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 'राफेल कराराचा सर्वाधिक फटका हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडला बसला आहे. याठिकाणी 30 हजार कर्मचारी आहेत. राफेल करारानंतर यातील 10 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येईल,' असं रेड्डी यांनी सांगितलं.
राहुल गांधी 13 ऑक्टोबरला हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राफेल करारावरुन मोदींवर निशाणा साधताना राहुल यांनी अनेकदा हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडचा उल्लेख केला आहे. फ्रान्सच्या डॅसो कंपनीनं राफेल विमानांच्या निर्मितीसाठी अनिल अंबानीच्या रिलायन्स डिफेन्सशी करार केला. हा करार करुन मोदींनी हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या तोंडचा घास हिरावला, असा आरोप राहुल यांनी अनेकदा केला आहे.