- शीलेश शर्मा नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा झेंडा पुढे करणाऱ्या भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांनी कुंभमेळादरम्यान त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा निर्णय घेतला आहे.उच्चपदस्थ सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार राहुल व प्रियंका मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमीला कुंभमेळात स्नान करतील. त्यामुळे देशभरात काँग्रेस केवळ मुस्लिमांचा पक्ष नसून सर्वधर्मसमभावामध्ये विश्वास असलेला सर्व धर्मांचा आदर करणारा पक्ष असल्याचा संदेश देता येईल. गांधी कुटुंबातील सदस्य कुंभमेळात स्नान करण्याचा हा पहिलाच प्रसंग राहणार नाही. यापूर्वी २००१ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही कुंभमेळात स्नान केलेले आहे.निवडणुकीपूर्वी प्रियंका यांचा पूर्व उत्तर प्रदेशातील प्रत्येक लोकसभा मतदार संघाचा दौरा करण्याचा प्रयत्न राहील. प्रियंका यांच्या रणनीतीचा विचार करता काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम निश्चित करणारी समिती निवडणुकीच्या प्रचार सभांची निवड त्याच पद्धतीने करत आहे. प्रियंका मायदेशात दाखल होण्यापूर्वी हा कार्यक्रम तयार होईल, असे मानल्या जात आहे. त्यामुळे प्रियंका येथे दाखल होताच त्यांच्या सहमतीने कार्यक्रम जाहीर करता येईल.प्रियंका गांधी ३१ जानेवारी रोजी मायदेशी पोहचत असल्यामुळे त्यांच्या उत्तर प्रदेश दौºयाला अद्याप अंतिम रुप देण्यात आलेले नाही. पक्षाच्या सूत्रानी सांगितले की, लखनौहून अलाहाबाद मार्गे प्रियंका पूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रियंका देशातील अन्य भागातही पक्षासाठी निवडक ठिकाणी प्रचारासाठी जातील. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, प्रियंका यांच्या प्रचार मोहिमेचे मुख्य केंद्र पूर्व उत्तर प्रदेश राहील. त्यासाठी त्या काही दिवस अलाहाबादमध्ये तळ ठोकतील.
राहुल व प्रियंका कुंभमेळ्यात स्नान करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 4:07 AM