Rahul Bhatt Killing: काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 'धोका असूनही सुरक्षा नाही मिळाली'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 01:53 PM2022-05-13T13:53:14+5:302022-05-13T14:41:24+5:30
Rahul Bhatt Killing: मी राहुल यांच्याशी हल्ल्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलले. मला माहित नव्हते की, १० मिनिटांनंतर त्यांना गोळ्या घातल्या जातील.
काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) राहुल भट्ट यांची जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम येथील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी (Terrorist) हत्या केली, त्याविरोधात आज (शुक्रवार) काश्मिरी पंडितांचा बडगाममध्ये निषेध सुरू आहे. दरम्यान, राहुल भट्ट यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. धोका असूनही पती राहुल भट्ट (Rahul Bhatt) यांना सुरक्षा देण्यात आली नसल्याचे तिने आरोप केला आहे.
हत्येच्या १० मिनिटे आधी पतीशी बोलले
राहुल भट्ट यांच्या पत्नीने सांगितले की, दहशतवाद्यांना तिथे राहुल असल्याचे कसं कळलं. सगळे राहुल यांना चांगले म्हणायचे. ते रस्त्यातून जाताना सगळे नमस्कार करायचे. त्यावेळी ते राहुलला सांगायचे की, तुझ्याशिवाय बडगाम अपूर्ण वाटते. मी राहुल यांच्याशी हल्ल्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलले. मला माहित नव्हते की, १० मिनिटांनंतर त्यांना गोळ्या घातल्या जातील.
राहुल भट्ट यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी नव्हते
ती पुढे म्हणाली की, खांद्याला गोळी लागल्याचे प्रथम कळले. मला वाटलं, खांद्याची एक बाजू जाईल, काहीही झालं तरी मी करेन. पाय गेले तरी मी काही ना काही केले असते. पण त्याला जीव गमवावा लागला. मी आता एकटीच राहिली आहे.माझ्यासोबत कोणीच नाही आहे. राहुलच माझं सर्वस्व होतं. राहुल भट्ट यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी नव्हते.
बडगाममध्ये आंदोलन सुरूच आहे
त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असे राहुल भट्टचे वडील म्हणाले. कटाचा भाग म्हणून हा प्रकार घडला. काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येविरोधात आज बडगाममध्येही निदर्शने झाली. राहुल भट्ट यांच्या हत्येबाबत लोकांमध्ये संताप आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे काश्मिरी पंडितांचे म्हणणे आहे. निदर्शनात महिलांचाही सहभाग आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येप्रकरणी आज जम्मूमध्येही निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात भाजपचे अनेक नेते सहभागी झाले होते.