नवी दिल्ली, दि. 18 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करताना पुन्हा एकदा चूक केली आहे. हे ट्विट त्यांनी भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अर्जन सिंह यांच्यासाठी केलं होतं. अर्जन सिंह यांचं शनिवारी निधन झालं. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना अर्जन सिंह यांचा एअर मार्शल असा उल्लेख केला. मार्शल ऐवजी एअर मार्शल लिहिल्याने ट्विटरकरांनी राहुल गांधींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. भारतील हवाईदलात मार्शलचा अर्थ पाच स्टार रँक प्राप्त अधिकारी असतो, तर एअर मार्शल म्हणजे चार स्टार रँक असते. पाच स्टार मिळवणारे अर्जन सिंह एकमेव अधिकारी होते. आपली चूक लक्षात येताच राहुल गांधी यांनी ट्विटर डिलीट करत दुरुस्ती केली. मात्र त्याआधीच त्यांचं ट्विट आणि चूक व्हायरल होऊ लागली होती.
डिलीट करण्यात आलेलं ट्विट -
काही दिवसांपुर्वीही राहुल गांधींकडून एक चूक झाली होती. अमेरिकेतील कॅलिफॉर्निया युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, प्रश्नोत्तरावेळी पुन्हा राहुल गांधी चुकले, ज्यावरुन सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली गेली. लोकसभेतील सदस्यांची संख्या 545 एवढी आहे. मात्र, एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी लोकसभेतील सदस्यांची संख्या 546 एवढी सांगितली. या चुकीवरुन सोशल मीडियावर राहुल गांधी यांची खिल्ली उडवली गेली.
भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आणि मार्शल ऑफ एअरफोर्स अर्जन सिंग (वय ९८ वर्षे) यांचे शनिवारी (16 सप्टेंबर) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच स्टार मिळवणारे अर्जन सिंह एकमेव अधिकारी होते. वयाच्या 45 व्या वर्षी सर्वात तरुण हवाईदल प्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला होता. हवाईदलात सेवा बजावताना 60 वेगवेगळ्या प्रकारची विमाने त्यांनी उडवली. 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 1969 रोजी अर्जन सिंह सेवानिवृत्त झाले.
अर्जन सिंह यांची 70 वर्षांची स्फूर्तिदायी कारकीर्दभारतीय हवाई दलाचे पहिले आणि एकमेव मार्शल अर्जन सिंग यांनी आधी हवाई दलाचे प्रमुख म्हणून व नंतर राज्यपाल, प्रशासक व राजदूत म्हणून सुमारे 70 वर्षांच्या स्फूर्तिदायी कारकीर्दीत बहुमोल देशसेवा केली.लष्करातील ‘फिल्ड मार्शल’शी समकक्ष असा हवाईदलाचे ‘मार्शल’ असा सर्वोच्च पंचतारांकित हुद्दा देऊन सरकारनेही या बहाद्दर योद्ध्याचे ऋण मान्य केले.
आॅगस्ट १९६४ मध्ये अर्जन सिंग हवाई दलाचे प्रमुख झाले, तेव्हा या दलातील सर्वात मोठा हुद्दा ‘एअर मार्शल’ असा होता. १९६५ मधील पाकिस्तानसोबतचे युद्ध जिंकण्यात त्यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाने जी निर्णायक भूमिका बजावली, त्याबद्दल अर्जन सिंग यांना ‘पद्मविभूषण’ हा दुसरा सर्वोच्च नागरी बहुमान दिला गेला. तसेच हवाईदल प्रमुखाचा हुद्दा वाढवून तो ‘एअर चीफ मार्शल’ असा केला गेला. अशा प्रकारे अर्जन सिंग भारतीय हवाई दलाचे पहिले ‘एअर चीफ मार्शल’ झाले.
जानेवारी २००२ मध्ये सरकारने अर्जन सिंग यांना ‘मार्शल आॅफ एअर फोर्स’ हा सर्वोच्च हुद्दा निवृत्तीनंतर बहाल केला. या दर्जाचा सैन्यदलातील हुद्दा मिळालेले हवाई दलाचे अर्जन सिंग व लष्कराचे ‘फिल्ड मार्शल’ सॅम माणेकशा हे भारतातील फक्त दोनच अधिकारी आहेत.गेल्याच वर्षी अर्जन सिंग यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त आसाममधील पनागढ हवाई तळाला ‘एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंग’ असे नाव दिले गेले. जिवंत अधिका-याचे नाव हवाई तळाला दिले जाण्याची ही एकमेव घटना आहे.हवाई दलातून सन १९६९ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतरही सुमारे ४७ वर्षे अर्जन सिंग यांनी अनेक प्रकारे आपल्या सेवा देशाला दिल्या. ते स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत व केनियामधील उच्चायुक्त होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
- जन्म १५ एप्रिल १९१९, ल्यालपूर (आता पाकिस्तानात).- कॉलेजमध्ये शिकत असतानाच वयाच्या १९ व्या वर्षी शाही ब्रिटिश हवाई दलात प्रशिक्षार्थी वैमानिक म्हणून निवड.- हवाई दलात दाखल झाल्यावर पहिली कामगिरी वायव्य सरहद्द प्रांतात.- जपानची मुसंडी रोखण्यासाठी झालेल्या आराकान मोहिमेत स्वाड्रन लीडर म्हणून सहभाग.- पहिल्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या फौजांच्या रंगूनपर्यंतच्या मुसंडीत स्वाड्रन लीडर म्हणून मोलाची कामगिरी. त्याबद्दल विशेष पदकाने गौरव.- भारत स्वतंत्र झाल्यावर १५ आॅगस्ट १९४७ रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिनी हवाई दलाच्या १०० विमानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या ‘प्लायपास्ट’चे नेतृत्व.