नवी दिल्ली- नमो अॅपवरून आता काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नमो अॅपच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला होता. त्याला आता भाजपानंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसला टेक्नॉलॉजीचं शून्य ज्ञान असल्याचा पलटवार भाजपानं केला आहे. केम्ब्रिज एनालिटिकाशी काँग्रेसच्या असलेल्या संबंधावरून लक्ष विचलित करण्यासाठी राहुल गांधींनी नमो अॅपचा मुद्दा उपस्थित केला आहे, असा आरोप भाजपानं केला आहे.भाजपानं राहुलच्या ट्विटला जोरदार विरोध केला आहे. राहुल आणि त्यांचा पक्ष लोकांमध्ये टेक्नॉलॉजीसंदर्भात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. तर काँग्रेस पक्ष स्वतःकडच्या 'ब्रह्मास्रा'द्वारे केम्ब्रिज एनालिटिकाच्या माध्यमातून लोकांचा डेटा चोरी करत आहेत. या अॅपद्वारे मोदींनी त्यांच्या लाखो कार्यकर्ते आणि चाहत्यांना त्यांच्याशी थेट संपर्क करण्याचं माध्यम उपलब्ध करून दिलं आहे, असं भाजपानं स्पष्ट केलं आहे. काँग्रेसकडून सोशल मीडियावर #DeleteNaMoApp अभियानही चालवण्यात येतेय. खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या वादात उतरले असून, ट्विटरवर एक पोस्ट टाकून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. मी नरेंद्र मोदी, मी तुमचा सगळा डेटा अमेरिकी कंपन्यांमधल्या माझ्या मित्रांना पुरवत आहे, अशी खोचक टिप्पणी राहुल गांधी यांनी ट्विटमधून केली आहे. रविवारी सकाळी राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नमो अॅपला टीकेचे लक्ष्य केले होते. या ट्विटमध्ये राहुल गांधी लिहितात, "हाय, माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. जेव्हा तुम्ही माझ्या अधिकृत अॅपमध्ये साइन इन करता तेव्हा मी तुमची सगळी माहिती अमेरिकी कंपन्यांना माझ्या मित्रांना देतो." नमो अॅपचा वापर करणाऱ्या व्यक्तींची खासगी माहिती त्यांची कुठलीही परवानगी न घेता अमेरिकन कंपन्यांना पुरवली जात असल्याचा आरोप होत आहे.नमो अॅपवरून काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. नरेंद्र मोदी अॅपवर खाते उघडणाऱ्यांची खासगी माहिती क्लेव्हर टॅप नामक अमेरिकन कंपनीला पाठवली जात असल्याचा आरोप एका ट्विट्च्या माध्यमातून केला जात होता. नमो अॅप अँड्रॉइट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, गुगल प्ले स्टोअर्सवर असलेल्या माहितीनुसार हे अॅप सुमारे 50 लाख हून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस केवळ मोदींनाच नव्हे तर मोदी अॅपलापण घाबरली असल्याचा टोला लगावला आहे.