नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील 11,300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. नीरव मोदी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौन बाळगण्यावर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जेव्हा हिरे व्यापारी नीरव मोदी मद्यसम्राट विजय माल्याप्रमाणे देश सोडून पळून जात होते, त्यावेळी ''देशाचे पहारेकरी'' कुठे होते?, असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला आहे. 2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी स्वतःला देशाचा पहारेकरी असल्याचं सांगत भ्रष्टाचाराचा खात्मा करण्यासाठी ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ असे आश्वासन दिले होते.
यावर राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, संपूर्ण देशाला पंतप्रधान मोदी यांच्या मौन बाळगण्यामागील रहस्य जाणून घ्यायचे आहे. यावरुन पंतप्रधान मोदी कुणाच्या बाजूनं आहेत हे जगजाहीर झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. सुरुवातीला ललित मोदी, त्यानंतर विजय माल्या आणि आता नीरव मोदीनं देशातून पळ काढला. खाणार नाही, खाऊही देणार नाही, असे म्हणणारा देशाचा पहारेकरी यावेळी कुठे होता?. जनतेला साहेबांच्या मौनमागील कारण जाणून घ्यायचे आहे. ते कुणासोबत आहेत, हे त्यांच्या मौनावरुन कळतंय. दरम्यान यावेळीही नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी ट्विटरवर ‘मोदीरॉब्सइंडिया’ असा हॅशटॅग वापरला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी वारंवार पंतप्रधान मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत आहेत. घोटाळ्याबाबत सर्व काही माहिती असतानाही मोदी काहीच कारवाई करत नाहीत, असा आरोपही राहुल गांधींनी केले आहे.