सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभवाची चिकित्सा करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी सिमला येथे दाखल झाले आणि पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. या निवडणुकीत काँग्रेसने ६८ पैकी केवळ २१ जागा जिंकून सत्ता गमावली होती. तसेच मावळत्या मंत्रिमंडळातील काँग्रेसचे पाच मंत्रीही पराभूत झाले होते. राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये जाऊन तेथेही पक्षाच्या पराभवामागच्या कारणांचा आढावा घेतला होता.यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे होते. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यातील नेत्यांशी चर्चा करून राज्यातील एकूण परिस्थितीचा अहवाल सादर केला होता.राहुल गांधी यांनी आज उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याशी स्वतंत्र चर्चा केल्याचे सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यातील चर्चा १२.३० वाजता सुरु झाली. शहरातील राजीव भवन येथे झालेल्या या बैठकीला माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू यांची उपस्थिती होती. (वृत्तसंस्था)
पराभवाची चिकित्सा करण्यासाठी राहुल गांधी हिमाचल प्रदेशमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 4:05 AM