भोपाळ : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यप्रदेश निवडणुकीचा 'शंखनाद' केला. भोपाळमधील लालाघाटी ते दसरा मैदानापर्यंतच्या 13 किमीच्या रॅलीला त्यांनी सुरुवात केली. यावेळी भोपाळमध्ये जागोजागी लागलेले शिवभक्त राहुल गांधी यांचे पोस्टर्स आणि कार्यकर्त्यांच्या हातामधली गणेश मूर्ती काँग्रेसच्या हिंदुत्ववादी भुमिकेबद्दल बरेच काही सांगून जात होती.
गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी मंदिरांना भेट देत तेथील जनतेला हिंदुत्वाबाबत नरमाई घेतल्याचे दाखविले होते. हीच रणनिती त्यांनी मध्यप्रदेशमध्ये राबविण्याचे ठरविले आहे. तसेच राहुल हे नुकतीच मानसरोवर यात्राही करून आले आहेत.
एका मोठ्या चौकातील पोस्टरवर राहुल शिवलिंगावर पाणी ओतत असताना दिसत आहेत. तर त्यांच्या पाठीमागे कैलास मानसरोवरचा फोटो आहे. तसेच त्यांना शिवभक्ताची उपमा दिली आहे. परंतू या पोस्टरांवरून दिग्विजय सिंह यांचे फोटो गायब झाले आहेत.