राहुल गांधी यांनी जाहीर केले ९ राष्ट्रीय सचिव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:34 PM2018-09-14T23:34:44+5:302018-09-14T23:35:04+5:30
तेलंगणात मुदतीपूर्वी विधानसभा बरखास्त झाल्याच्या काही दिवसांनंतर काँग्रेसने शुक्रवारी तीन सदस्यीय छाननी समितीची स्थापना केली आहे
नवी दिल्ली : तेलंगणात मुदतीपूर्वी विधानसभा बरखास्त झाल्याच्या काही दिवसांनंतर काँग्रेसने शुक्रवारी तीन सदस्यीय छाननी समितीची स्थापना केली आहे. माजी केंद्रीय मंत्री भक्तचरण दास याचे अध्यक्ष असतील, तसेच पक्षाने ९ राष्ट्रीय सचिवांची नियुक्ती केली आहे. ते विविध राज्यांत सह प्रभारींच्या भूमिकेत असतील.
काँग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत यांनी सांगितले की, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सचिवांच्या नियुक्तीसह अन्य काही नियुक्त्याही जाहीर केल्या आहेत. तेलंगणासाठी स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीत ज्योतिमणी सन्नामलाई आणि शर्मिष्ठा मुखर्जी हे सदस्य आहेत. ६ सप्टेंबर रोजी तेलंगणा राष्ट्रीय समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात मुदतीपूर्वीच विधानसभा बरखास्त केली, त्यामुळे काही महिन्यांच्या आतच येथे विधानसभा निवडणुका होऊ शकतात. टीआरएसने बहुतांश जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
हे आहेत नवे सचिव
काँग्रेसने अरुणाचल प्रदेशसाठी जेनिथ संगमा, मेघालयसाठी व्हिक्टर केशिंग, मणिपूर-चार्ल्स पिंगरोज, मिझोराम- अम्परीन लिंगदोह, नागालँड- प्रद्युत बारदोलोई, सिक्किम- प्रद्युत देव बर्मन, त्रिपुरा- भूपेन कुमार बोरा, जम्मू-काश्मीर- सुधीर शर्मा आणि तामिळनाडूसाठी सिरिवेला प्रसाद यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. माजी खासदार नाना पटोले यांची ‘किसान खेत मजदूर काँग्रेस’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.