...जेव्हा चुकून लेडिज टॉयलेटमध्ये घुसले राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 12:34 PM2017-10-12T12:34:51+5:302017-10-12T12:58:41+5:30
राहुल गांधी आपल्या 'संवाद' कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणांशी संवाद साधण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर राहुल गांधी बाहेर पडले आणि थेट महिला शौचालयात प्रवेश केला.
अहमदाबाद - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या निवडणूक प्रचारासाठी गुजरात दौ-यावर आहेत. यावेळी त्यांच्याकडून चुकून झालेल्या एका गोष्टीमुळे सोशल मीडियाकरांना खिल्ली उडवण्याची अजून एक संधी मिळाली. झालं असं की, राहुल गांधी प्रचारासाठी छोटापूर जिल्ह्यात पोहोचले होते. यावेळी राहुल गांधी महिला शौचालयात घुसले, आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. राहुल गांधी आपल्या 'संवाद' कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणांशी संवाद साधण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर राहुल गांधी बाहेर पडले आणि थेट महिला शौचालयात प्रवेश केला. मात्र यामध्ये राहुल गांधींची काहीच चूक नव्हती, कारण शौचालयाबाहेर कोणताही बोर्ड किंवा चिन्ह लावण्यात आलं नव्हतं. ज्यामुळे महिला शौचालय आणि पुरुष शौचालयातील फरक लक्षात आला नाही.
शौचालयाबाहेर गुजराती भाषेत एक पोस्टर चिकटवण्यात आला होता. या पोस्टरवर ‘महिला माटे शौचालय।’असं लिहिण्यात आलं होतं. सुत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, गुजराती भाषेत लिहिण्यात आलेलं ते पोस्टर राहुल गांधी वाचू शकले नाहीत, त्यामुळे ते चुकून महिला शौचालयात घुसले होते. उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याकडून चूक झाल्याचं लक्षात येताच राहुल गांधी लगेचच शौचालयाबाहेर आले. यावेळी बाहेर उपस्थित लोक त्यांच्याकडे पाहून हसत होते. ही संपुर्ण घटना उपस्थित प्रसारमाध्यमांनी कॅमे-यात कैद केली.
याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी अहमदाबादमध्ये कॉलेज विद्यार्थ्यांना संबोधित करताना भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप केला होता. RSS च्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. भाजपाचा मुख्य आधार आरएसएस आहे, या संघटनेत किती महिला आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कधी बघितलंय का कुणी महिलांना या शाखांमध्ये अर्ध्या चड्डीत, मी तर नाही बघितलं कधी, अशी विचारणा त्यांनी केली.
गुजरातमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून राहूल गांधींनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात आतापासून प्रचाराचा धुराळा उडवला आहे. भाजपा तसेच संघावर ते जोरदार हल्ला चढवत असून आता भाजपा व संघामध्ये पुरूषी मनोवृत्तीचं राज्य चालतं व महिलांना तिथं स्थान नाही असा हल्ला ते चढवत आहेत. जोपर्यंत महिला गप्प बसतात, तोंड उघडत नाहीत, तोपर्यंत ठिक असतं, परंतु महिलांनी तोंड उघडलं की त्यांना गप्प करायचं अशी भाजपाची व संघाची नीती असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधी यांच्या टीकेला राष्ट्रसेविका समितीतर्फे जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. राहुल गांधी हे काँग्रेसचे जबाबदार नेते असून, त्यांनी सखोल माहिती घेऊन बोलणे अपेक्षित आहे. राष्ट्रसेविका समितीची संघाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असून संघाबाबत राहुल गांधींचे अज्ञान दिसून आले आहे, या शब्दांत प्रमुख संचालिका शांताक्का यांनी टीका केली.