- शीलेश शर्मा नवी दिल्ली : संपूर्ण भाजपा ज्यांना पप्पू म्हणून संबोधतो त्या राहुल गांधी यांच्या कठोर मेहनतीमुळे काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांत ‘अजेय’चा दावा करणाऱ्या भाजपाचे सिंहासन हलवून सोडले. ३ राज्यांतील विजय काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. कारण, ११ डिसेंबर २०१७ रोजी राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. बरोब्बर एका वर्षांनंतर ११ डिसेंबर २०१८ रोजी ३ राज्यांतून भाजपाला बाहेर करीत, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस चांगले यश मिळवू शकते, हे सिद्ध केले.मतमोजणी सुरू झाल्यानंतर आणि विजयाचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दहा जनपथवर पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी निश्चित केले की, कोणत्या राज्याची सूत्रे कोणत्या नेत्याकडे सोपवावी. २०१९ च्या लोकसभा निवडणुका पाहता, निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली जावीत. प्रादेशिक पक्षांबाबत राहुल गांधी हे गंभीर आहेत. त्यामुळेच राजस्थान, मध्यप्रदेशात बसपा आणि सपाला सोबत घेतले जाऊ शकते.मिझोराम आणि तेलंगणात यश न मिळाल्याची खंत काँग्रेसमध्ये नाही. तेलंगणात तेलुगू देसम पार्टीच्या विरोधात वातावरण आहे हे माहीत असूनही काँग्रेसने त्यांच्याशी आघाडी केली. कारण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी चंद्राबाबू यांची महत्त्वाची भूमिका राहू शकते, हे जाणून हा निर्णय घेतला. मध्यप्रदेशातील निकालाचा कल येताच राहुल गांधी हे थेट अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्या संपर्कात आहेत. जेणेकरून गरज पडल्यास त्यांची मदत घेतली जाऊ शकेल.
राहुल गांधी यांनी एक वर्षात तीन राज्यांतून भाजपाला हटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 6:43 AM