पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक, सुरक्षेत तैनात गाड्या रस्ता चुकल्या, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:57 PM2022-06-07T19:57:23+5:302022-06-07T19:58:08+5:30
Rahul Gandhi Security Lapse: काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज हत्या झालेला गायक सिद्धू मुसेवाला याच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पंजाबमध्ये गेले होते. त्यावेळी राहुल गांधींच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
चंडीगड - काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज हत्या झालेला गायक सिद्धू मुसेवाला याच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पंजाबमध्ये गेले होते. त्यावेळी राहुल गांधींच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत तैनात असलेला वाहनांचा ताफा २० ते २५ मिनिटे पतियाळामधील गल्लीबोळात फिरत राहिला. तर राहुल गांधी कुठल्याही सुरक्षेविना मुसेवाला यांच्या घरी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार चंडीगड विमानतळावरून मानसा येथे जाण्यासाठी पंजाब प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राजा वडिंग यांनी राहुल गांधी यांना आपल्यासोबत गाडीत बसवले. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रताप सिंह बाजवा हेसुद्धा होते. मात्र त्याचवेळी त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने वेगळा रस्ता निवडून गाडी बायपासवरून थेट संगरूर मानसा रोडवरून नेली. मात्र राहुल गांधी यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या ताफ्याला याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या दोन गाड्या बायपासवरून चुकून पतियाळा शहरामध्ये गेल्या.
त्यानंतर दोन्ही सिक्युरिटीच्या गाड्या सुमारे २० ते २५ मिनिटे पतियाळा शहरामध्येच फिरत राहिल्या. तोपर्यंत राहुल गांधी आपल्या सहकाऱ्यांसह मुसेवालाच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी मुसा गावात पोहोचले आणि त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली.
जेव्हा बराच वेळ राहुल गांधी यांच्या सुरक्षा ताफ्यामधून रस्ता मिळाला नाही, तेव्हा पतियाळा पोलिसांच्या जवानांनी त्यांची मदत केली आणि त्यांच्या गाडीला शहरातून बाहेर काढून संगरूर मानसा रोडवर आणले. त्यानंतर हा काफिला मुसा गावात पोहोचला.
आता चिंतेची बाब म्हणजे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली होती. तर राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, तसेच विधानसभा निवडणुकांचा काळ सुरू होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेसाठी जात असताना रस्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांचा ताफा बराच वेळ अडकून पडला होता.