नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमधील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रगतीपुस्तक सादर केले. यामध्ये कर्नाटकमधील कृषी क्षेत्रात भाजपाला आलेल्या अपयशाचा आढावा घेण्यात आला आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपाने कर्नाटकमधील शेतकऱ्यांना एकाही पैशाची कर्जमाफी दिली नाही. तसेच पंतप्रधान पीकविमा योजनाही पूर्णपणे अयशस्वी ठरली. यामुळे केवळ खासगी कंपन्यांचा फायदा झाला आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे. एकूण सर्वच पातळ्यांवर मोदी सरकार नापास झाल्याचेही राहुल यांनी म्हटले आहे. याशिवाय, राहुल यांनी हमीभावाच्या मुद्द्यावरूनही भाजपाला लक्ष्य केले. येथील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक रक्कम हमीभाव म्हणून निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांना त्याचा बिलकूल फायदा झाला नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे. मात्र, राहुल यांच्या ट्विटनंतर अनेकांनी उलट काँग्रेसवरच टीका करायला सुरूवात केली. सिद्धरामय्या यांच्या काळात राज्यात कोणतीही विकासकामे झाली नाहीत. सरकारी निधीचा योग्य वापर करण्यात त्यांच्या सरकारला अपयश आले, असे अनेक टीकाकारांचे म्हणणे आहे.
राहुल गांधींनी ट्विट केले मोदींचे प्रगतीपुस्तक; काँग्रेसवरच उलटला डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:20 PM