नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून एअर स्ट्राईक केला गेला यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांना कोणत्या प्रश्नांची उत्तरे हवीत? भारतीय हवाई दलाच्या धाडसावर एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्न नाही. राहुल गांधी यांनी देशातील जनतेची, शहीदांच्या कुटुंबियांची आणि भारतीय जवानांची माफी मागितली पाहिजे असा हल्लाबोल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. भाजपा मुख्यालयात अमित शहा यांची पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये ते बोलत होते.
अमित शहा यावेळी म्हणाले की, जेव्हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारताच्या विरोधात नारेबाजी होते तेव्हा काँग्रेस त्या गोष्टीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा देते आणि पुलवामा सारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअर स्ट्राईकने उत्तर दिले जाते तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात. ही किती दुर्दैवी घटना आहे पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवत आहे. दहशतवाद्यांना उत्तर देण्याची गरज नाही काय, असा सवालही त्यांनी राहुल गांधी यांना केला.
निवडणुका जवळ आल्यावर काँग्रेस मतांचे राजकारण करते. पित्रोदा यांनी शहिदांचा अपमान केला आहे. पुलवामासारखा हल्ला ही रोज घडणारी घटना आहे असे काँग्रेसला वाटते का ? काँग्रेसकडून होणाऱ्या अशा विधानांमुळे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळतयं, पित्रोदा यांनी केलेल्या विधानाबाबत राहूल यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही अमित शहा यांनी केली.
पित्रोदा यांनी केलेल्या विधानाशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहमत आहेत काय? या विधानाशी सहमत नसतील तर या राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही शहा यांनी केली आहे. पित्रोदा यांच्या विधानावरून भाजपा काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी सरकारच्या कुटनीतीमुळेच जेव्हा भारताने पाकिस्तानमध्ये एअर स्टाइक केले तेव्हा संपूर्ण जग भारताच्या मागे उभे राहिले होते आणि पाकिस्तानला एकटे पाडण्यात यश आलं होतं असा दावा अमित शहा यांनी केला.