राहुल गांधी यांच्या जागी तरुण नेतृत्वाला संधी द्यावी - अमरिंदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 04:46 AM2019-07-07T04:46:57+5:302019-07-07T04:46:59+5:30
राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पुरोगामी दृष्टिकोन असलेला तरुण नेताच पक्ष कार्यकर्त्यांत जोश निर्माण करू शकेल.
- शीलेश शर्मा
चंदीगड : राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदावर केवळ प्रभावशाली तरुण नेतृत्वालाच संधी द्यायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केले.
अमरिंदरसिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पुरोगामी दृष्टिकोन असलेला तरुण नेताच पक्ष कार्यकर्त्यांत जोश निर्माण करू शकेल. अखिल भारतीय पातळीवर आवाहन क्षमता असलेला, तसेच तळागाळापर्यंत अस्तित्व असलेल्या करिश्माई तरुण नेत्यालाच राहुल गांधी यांच्या जागी स्थान द्यायला हवे.
अमरिंदरसिंग यांनी म्हटले की, तरुण नेतृत्वाने पक्षाची धुरा हाती घेऊन पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचा मार्ग राहुल गांधी यांनी दाखवून दिला आहे. तरुण लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगाचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे लोकभावना समजून घेणे आणि तिच्याशी समरूप होणे हे तरुण नेतृत्वाला प्रभावीपणे साध्य होणे हे नैसर्गिकच आहे. भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील आहे. पक्ष नेतृत्वात बदल करताना भारतीय समाजाचे हे वास्तव त्यात प्रतिबिंबित व्हायलाच हवे.
सिंग यांनी म्हटले की, राजीनाम्यावर ठाम राहण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय पक्षासाठी निश्चितच निराशाजनक आणि धक्कादायक आहे. त्यांच्यासारख्याच तरुण आणि प्रभावशाली नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्ष या धक्क्यातून सावरू शकतो. सर्वांत जुन्या पक्षाला तरुण नेताच पुनरुज्जीवित करू शकतो. राहुल गांधी यांनी पक्षात भरलेली ऊर्जा काँग्रेस नेत्यांनी कायम ठेवायला हवी. पक्षाला पुन्हा एकमेव पर्यायाच्या स्थितीत नेण्यासाठी एका तरुण नेतृत्वाची गरज आहे. अमरिंदर सिंग यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदी अशा तरुण नेत्याची निवड व्हायला हवी, जो भारतातील बहुसंख्य लोकांशी समरूप होऊ शकेल, जो पक्षाला नव्या विचाराचा डोस देऊ शकेल, जो देशाला सत्ताधारी भाजपच्या प्रतिगामी आणि विध्वंसक धोरणांपासून वाचवू शकेल.
हालचाली गतिमान
दरम्यान, नवीन अध्यक्ष निवडण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये गतिमान झाल्या आहेत. नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी होणाऱ्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीस राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी या उपस्थित राहणार नसल्याचे समजते.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, पक्षाचे ज्येष्ठ सरचिटणीस या नात्याने मुकुल वासनिक अध्यक्षपदासाठी दावा सादर करीत आहेत. अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास ज्येष्ठ सरचिटणीसाकडे अध्यक्षपद सोपविण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेस पक्षातील अधिकांश नेते मात्र अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाला अधिक पसंती देत आहेत. त्यातही गेहलोत आणि खडगे हे स्पर्धेत पुढे आहेत.