नवी दिल्ली - आपल्या कविता आणि विधानांमुळे रिपाइचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यावर केलेल्या कवितेमुळे रामदास आठवले चर्चे होते. आता, राहुल गांधींच्या लग्नासंदर्भात आठवलेंनी विधान केले आहे. हम दो हमारे दो... या घोषवाक्याची जनजागृती करण्यासाठी राहुल गांधींनी अगोदर लग्न करावे, असा सल्ला आठवलेंनी दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे अविवाहित असल्यामुळे त्यांच्या विवाहाची नेहमीच चर्चा होत असते. देशातील बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या लग्नासंदर्भात अनेकदा जाहीरपणे मतंही व्यक्त होतात. आता, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींच्या लग्नासंदर्भात आणि कुटुंब नियोजनाच्या जनजागृतीबाबत मत व्यक्त केलं आहे. कुटुंब नियोजनासाठी हम दो हमारे दो या घोषवाक्यातून जनजागृती केली जाते. जर, राहुल गांधींना याची जनजागृती करायची असेल तर त्यांनी अगोदर लग्न करायला हवं. विशेष म्हणजे राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करुन महात्मा गांधींचं जातीव्यवस्थेचं मूळ नष्ट करण्याचं स्वप्न पूर्ण करावं, असेही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं.