नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मर्यादा सांभाळून शब्दांचा वापर करा अशी संतप्त प्रतिक्रिया ट्विट करुन दिली आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करताना अडवाणींचा उल्लेख केला. त्यावर सुषमा स्वराज यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सध्याच्या भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र, मोदींनी त्यांना डावलले. 'हिंदू धर्मात गुरू-शिष्याच्या नात्याला विशेष महत्त्व आहे. आडवाणी हे मोदींचे गुरू आहेत. मात्र, मोदी कुठलंही नातं मानत नाहीत. गुरू समोर आल्यानंतर साधे हातही जोडत नाहीत. त्यांनी आपल्या गुरूला बूटांनी मारून स्टेजवरून खाली फेकलं आहे,' असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता त्यावर सुषमा स्वराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
'अडवाणी हे आम्हाला पितृतुल्य आहेत. त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळं आम्हाला वेदना झाल्या आहेत. त्यांनी भाषेचा वापर करताना मर्यादा पाळाव्यात असं सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
लालकृष्ण अडवाणी यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून तिकीट दिलं नाही. अडवाणी यांचा गांधीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना तिकीट दिल्याने अनेकांनी भाजपावर टीका केली होती. अनेक दिवस मौन बाळगल्यानंतर शुक्रवारी लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉग लिहून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली.
भाजपाच्या स्थापना दिवसाच्या एक दिवस आधी अडवाणी यांनी लिहलेल्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की, देशात लोकशाहीचं महत्त्व असून भाजपाने कधीच कोणाला आपलं शत्रू मानलं नाही. भाजपाच्या विरोधात असेल तो देशविरोधी असू शकत नाही. आपल्या विचारांशी सहमत नाही ते आपले राजकीय विरोधक असतात. शत्रू नाही असं त्यात सांगण्यात आलं आहे.