रांची: सर्व चोरांची नावं मोदीच का असतात? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी. मला एक गोष्ट सांगा. सर्व चोरांची नावं मोदीच का असतात?', असा प्रश्न करत राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी राफेलच्या मुद्यावरुन मोदींवर कडाडून टीका केली. काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुल प्रथमच झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला एअर स्ट्राइक आणि राफेल करार यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली. 'भारतीय हवाई दल देशाचं रक्षण करतं. देशाच्या संरक्षणासाठी हवाई दलाचे वैमानिक बलिदान देतात. मात्र आमचे पंतप्रधान हवाई दलाचा पैसा अनिल अंबानींच्या खिशात घालतात,' अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले. ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नावं घेत सर्व चोरांची नावं मोदीच का असतात, असा सवाल त्यांनी विचारला. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच झारखंडचा दौरा करत आहेत. यासाठी आज ते दुपारी दिल्लीहून झारखंडला पोहोचले. यानंतर त्यांनी रांचीतील मोरहाबादी मैदानात जनसभेला संबोधित केलं. त्याआधी त्यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. राहुल यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जनसभेला संबोधित करण्याआधी त्यांनी आदिवासींची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत नृत्यही केलं. राहुल गांधींच्या सभेवेळी मंचावर माजी मुख्यमंत्री आणि झारखंड विकास मोर्चाचे प्रमुख बाबुलाल मरांडी उपस्थित होते. मात्र या सभेला झारखंड विकास मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन उपस्थित नव्हते. राहुल यांच्या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. राहुल यांच्या जनसभेआधी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी यात्रा काढली. त्यांच्या सभेला काँग्रेससह झारखंड विकास मोर्चा आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.