नवी दिल्ली: महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एकही महिला नसल्यानं पंतप्रधान बलात्कारासारख्या घटनांवर बोलत नाहीत, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी भाजपा आणि संघावर निशाणा साधला. ते दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या महिला काँग्रेसच्या संमेलनात बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एकही महिला नाही. संघाचे दरवाजे महिलांसाठी बंद आहेत. त्यामुळेच मोदी बलात्कारासारख्या घटनांवर मूग गिळून गप्प बसतात, अशी टीका राहुल गांधींनी केली. मोदी बुलेट ट्रेनवर बोलतात. मात्र बलात्कारासारख्या घटनांवर बोलत नाहीत, असं म्हणत राहुल यांनी बिहारच्या मुजफ्फरपूरमधील बालिकाश्रमातील बलात्कार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. मोदींच्या या मौनावर राहुल गांधींनी सवाल उपस्थित केले. संसद आणि विधानसभेत महिलांना आरक्षण द्यावं, अशी मागणी काँग्रेसकडून वारंवार उपस्थित केली जात आहे. याविषयी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिलं होतं. या मुद्यावर आपण विनाअट सरकारला संसदेत सहकार्य करु, असं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं. पक्षातील वरिष्ठ पदांवर जास्तीत जास्त महिलांना संधी दिली जाईल, असं राहुल यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं.