नवी दिल्ली : रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका डॉलरच्या तुलनेत रुपया 70 वर जाऊन पोहोचला आहे. यावरुन काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. रुपयाच्या वाढत्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींच्याच व्हिडीओचा वापर केला आहे. यामध्ये मोदी रुपयाच्या घसरणीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असतानाचा आहे. राहुल गांधींनी ट्विटरवरुन मोदींना लक्ष्य केलं आहे. 'भारतीय रुपयानं सर्वोच्च नेत्याविरोधात ऐतिहासिक घसरणीनंतर अविश्वास ठराव आणला आहे. सर्वोच्च नेत्याचं अर्थव्यवस्थेवरील अगाध ज्ञान या व्हिडीओमधून ऐका. या व्हिडीओमध्ये सर्वोच्च नेते रुपयाच्या मूल्यात सतत होत असलेल्या अवमूल्यनाची कारणं सांगत आहेत,' अशा शब्दांमध्ये राहुल यांना टोला लगावला आहे. याआधी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह आम आदमी पक्षानं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
रुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 4:29 PM