कोलार (कर्नाटक) - काँग्रेसला सहा रोग लागले असून तो पक्ष जिथे जातो, तिथे या रोगांची लागण होते, अशी टीका करतानाच, स्वत: पंतप्रधान होण्यास आपण तयार आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगणे हा त्यांच्या अहंकाराचा पुरावा आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.काँग्रेस कल्चर (संस्कृती), कम्युनलिझम (सांप्रदायिकता), कास्टिझम (जातियवाद), करप्शन (भ्रष्टाचार), क्रिमिनलायझेशन (गुन्हेगारीकरण), व काँट्रॅक्टर (कंत्राटदारी) अशा सहा ‘सी’ ने कर्नाटकचे भवितव्य बिघडवून टाकले आहे, असे नरेंद्र मोदी कोलारमधील बांगरपेट येथे जाहीर सभेत म्हणाले. कोणीतरी मी पंतप्रधान होईन, अशी घोषणा केली. स्वत:ला अशा प्रकारे पंतप्रधान म्हणून घोषित करणे हा अहंकाराचा पुरावा आहे. एकीकडे भाजपाला हटवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत असताना, त्यातील एका पक्षाचा नेता इतरांना विचारात न घेताच, स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करतो, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. मोदी यांनी आज राज्यात तीन सभा घेतल्या. चिकमंगळूरच्या सभेत त्यांनी बनावट ओळखपत्रांचा उल्लेख करून, त्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. (वृत्तसंस्था)
राहुल गांधी हे तर अहंकारी नेते - नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 1:45 AM