राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 03:49 PM2024-12-11T15:49:55+5:302024-12-11T15:51:02+5:30

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी काही मुद्दे अध्यक्षांसमोर मांडले. 

Rahul Gandhi suddenly met Lok Sabha Speaker Birla, what was the topic? | राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?

राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अदाणींसह काही मुद्द्यांवरून लोकसभेत जोरदार गोंधळ सुरू आहे. इंडिया आघाडीने बुधवारीही संसदेत अदाणींच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. इंडिया आघाडीला कामकाज होऊ द्यायचे नाही, असे म्हणत भाजपने लक्ष्य केल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. 

लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

राहुल गांधी म्हणाले, "मी अध्यक्षांची भेट घेतली आणि सांगितले की सभागृहाचे कामकाज झाले पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. भाजप आरोप करत आहे. पण भाजपकडून चिथवले जात असले, तरी काम व्हायला हवे. आम्ही सर्व प्रकारची चर्चा करू इच्छितो. मग ते माझ्याबद्दल काहीही बोलले तरी आम्हाला चर्चा हवी आहे."

"भाजप अदाणी मुद्द्यावरून लक्ष्य विचलित करू इच्छित आहे. सोरोस यांच्यावरून भाजप आरोप करत आहे, पण माझे म्हणणे आहे की, आरोपांनी मला काहीही फरक पडत नाही. सभागृह चालवण्याची जबाबदारी आमची नाहीये, तरीही आम्ही म्हणत आहोत की सभागृहात कामकाज झाले पाहिजे", अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. 

राहुल गांधी यांनी संसद परिसरात अदाणी मुद्द्यावरून आपला विरोध दर्शवण्यासाठी फूल आणि तिरंगा आंदोलन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना त्यांनी फूल आणि तिरंगा भेट दिला. 

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने अदाणींचा मुद्दा लावून धरला आहे. अदाणी अटक करण्याची मागणी राहुल गांधी सातत्याने करत असून, या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. 

Web Title: Rahul Gandhi suddenly met Lok Sabha Speaker Birla, what was the topic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.