नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा आपल्या चुकीमुळे ट्रोल झाले आहेत. राहुल गांधी यांनी ट्विटरवर कोरोना व्हायरसवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका केली. मात्र, यावेळी ट्विट करताना त्यांच्याकडून एक चूक झाली. यावरून राहुल गांधी यांच्यावर नेटिझन्ससह विरोधकांनी ट्रोल केले.
''कोरोना विषाणूचा देशातील नागरिक आणि अर्थव्यवस्थेला धोका आहे. मात्र, सरकारने या संकटाकडे पुरेसे गांभीर्याने पाहिलेले नाही. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी त्वरित उपाययोजना होण्याची गरज आहे,'' असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. याचबरोबर, राहुल गांधी यांनी या ट्विटसोबत एक मॅप पोस्ट केला होता. मात्र, या मॅपमध्ये जम्मू-काश्मीरमधील एक भाग पाकिस्तामध्ये असल्याचे दिसून आल्यानंतर नेटिझन्ससह विरोधकांनी त्यांच्यावरच निशाणा साधला आणि त्यांना ट्रोल केले. दरम्यान, राहुल गांधी यांनी यासंदर्भातील ही चूक लक्षात आल्यानंतर लगेच ते ट्विट डिलीट केले आणि एका बातमीसह दुसरे ट्विट पोस्ट केले.
दरम्यान, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी पुरेशी दक्षता घेतली जात असल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले होते. तसेच, चीनमधून येणाऱ्या लोकांकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याशिवाय वुहान येथून आलेल्या लोकांवर लष्कर आणि आयटीबीपीच्या केंद्रात ठेवून लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्राने सांगितले होते.
चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण आहे. चीनमध्ये आतापर्यंत ४४ हजार जणांना या विषाणूची लागण झाली आहे. तसेच चीनबाहेरही या विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सध्या भीषण परिस्थिती असून, या विषाणूचा फैलाव झालेल्या हुबेई प्रांताचा संपर्क चीनच्या इतर भागापासून तोडण्यात आला आहे. तसेच येथील नागरिकांना घरांमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे