नवी दिल्ली : पीएनबीमधील हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याचे आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांचे लागेबांधे आहेत आणि त्याला भारतातून पळून जायला अरुण जेटली यांनीच मदत केली, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.अर्थमंत्री अरुण जेटली यांची कन्या सोनाली व जावई जयेश यांच्या जेटली असोसिएट्स या कंपनीला मेहुल चोक्सीकडून २४ लाख रुपये मिळाले होते, ते त्यांच्या बँक खात्यात भरण्यात आल्याचे पुरावेही आहेत, असे राहुल गांधी यांनी रायपूरच्या सभेत सांगितले.जेटली यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते सचिन पायलट व खा. राजीव सातव यांनीही पत्रकार परिषदेत केली. खा. सचिन पायलट म्हणाले की, जेटली असोसिएट्सने मेहुल चोक्सीच्या गीतांजली जेम्सकडून रिटेनरशिपसाठी डिसेंबर २0१७ मध्ये २४ लाख रुपये घेतले होते. म्हणजेच जेटली यांच्या कुटुंबीयांचे चोक्सीशी आर्थिक संबंध होते. जेटली यांना मेहुल चोक्सीच्या गैरव्यवहारांची सर्व माहिती होती, पण मुलगी व जावई यांच्यावरील प्रेमामुळे त्यांनी हे व्यवहार दडवून ठेवले.हे २४ लाख रुपये जेटली असोसिएट्सला दिल्यानंतर काहीच दिवसांनी म्हणजे ४ जानेवारी रोजी मेहुल चोक्सी ४ जानेवारी रोजी पळून गेला, पण सीबीआयने पहिला एफआयआर दाखल केला ३१ जानेवारी रोजी. दुसरा एफआयआर फेब्रुवारीत दाखल करण्यात आला. त्यानंतर, ही रक्कम जेटली असोसिएट्सने गीतांजली जेम्सला परत केली, असे सांगून खा. सचिन पायलट यांनी ती रक्कम चोक्सीऐवजी सरकारच्या खात्यात जमा का केली नाही, असा सवाल केला.चोक्सी प्रकरणाचा तपास सुरू असताना, जेटली यांची कन्या व जावई यांना चौकशीसाठी का बोलाविण्यात आले नाही, असा सवालही त्यांनी केला. मोदी सरकारच्या ४४ महिन्यांत २३ घोटाळेबाजांनी ५३ हजार कोटी फसविल्याची टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान कार्यालयाने २0१६ रोजी सर्व तक्रारी अर्थमंत्र्यांकडे पाठविल्या, पण त्यावर अर्थमंत्र्यांनी काहीच कारवाईकेली नाही.>चोक्सीच्या पेरोलवर होती अर्थमंत्र्यांची कन्याअर्थमंत्री जेटली यांची कन्या सोनाली ही मेहुल चोक्सी याच्या पेरोलवर होती, असा आरोप काँग्रेस राहुल गांधी यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे. तसे करताना सोनाली यांच्या आयसीआयसीआय बँकेतील खाते क्रमांकही राहुल गांधी यांनी शेअर केला आहे. प्रसारमाध्यमांना धमक्या देऊ न या संबंधीच्या बातम्या दडपून टाकण्यात आल्या, असेही राहुल गांधी यांनी रायपूर येथीलजाहीर सभेत बोलून दाखविले.
मेहुल चोक्सी याला पळून जाण्यास जेटलींचीच मदत, राहुल गांधींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 6:21 AM