कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार पुरेसे गंभीर नाही, राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:30 PM2020-02-12T22:30:31+5:302020-02-12T22:31:29+5:30
चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव भारतासारख्या देशातही होण्याची धोका आहे.
नवी दिल्ली - चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव भारतासारख्या देशातही होण्याची धोका आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना विषाणूवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना विषाणूच्या संकटाकडे केंद्र सरकार म्हणावे तसे गांभीर्याने पाहत नाही आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
चीनमधील वुहानमधून सुरुवात होऊन जगातील २५ हून अधिक देशात कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकारकडून पुरेशा उपाययोजना केल्या गेल्या नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्विट करून केला आहे. ''कोरोना विषाणूचा देशातील नागरिक आणि अर्थव्यवस्थेला धोका आहे. मात्र सरकारने या संकटाकडे पूरेसे गांभीर्याने पाहिलेले नाही. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी त्वरित उपाययोजना होण्याची गरज आहे,''असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी पुरेशी दक्षता घेतली जात असल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले होते. तसेच चीनमधून येणाऱ्या लोकांकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याशिवाय वुहान येथून आलेल्या लोकांवर लष्कर आणि आयटीबीपीच्या केंद्रात ठेवून लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्राने सांगितले होते.
चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण आहे. चीनमध्ये आतापर्यंत ४४ हजार जणांना या विषाणूची लागण झाली आहे. तसेच चीनबाहेरही या विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सध्या भीषण परिस्थिती असून, या विषाणूचा फैलाव झालेल्या हुबेई प्रांताचा संपर्क चीनच्या इतर भागापासून तोडण्यात आला आहे. तसेच येथील नागरिकांना घरांमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.