अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांची 'पप्पू' म्हणून तयार झालेली प्रतिमा बदलण्यात ब-याच प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधींची सोशल मीडियावर पप्पू अशी इमेज तयार झाली होती. त्यांनी केलेली वक्तव्य, टीकेला कोणीही गांर्भीयाने घेत नव्हते. उलट त्यांच्या वक्तव्यातून सोशल मीडियावर जोक व्हायरल व्हायचे.
पण गुजरात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यापासून त्यांच्या या इमेजमध्ये मोठा बदल झाला आहे. राहुल गांधींनी आज गुजरातमध्ये भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. जो सोशल मीडिया राहुल गांधींचे पाय खेचायचा तोच सोशल मीडिया राहुल गांधींच्या टि्वटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत आहे. हा झालेला मोठा बदल आहे.
राहुल गांधी अत्यंत कल्पकतेने टि्वटरचा उपयोग करुन मोदींची कोंडी करत आहेत. जो फंडा मोदींनी 2014 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी वापरला तोच राहुल आता वापरत आहेत. शेरो-शायरी आणि त्यांच्या उपरोधिक टि्वटची मोठया प्रमाणावर दखल घेतली जातेय.