केरळ : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना देशाच्या राजकारणातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. राहुल गांधी यांचं वायनाडमधील कार्यालय फोडल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी कार्यालयाच्या तोडफोड केल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील सामानाचे नुकसान झाले आहे. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या निर्णयामुळे एसएफआयचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना या मुद्द्यावर राहुल गांधींचे मत जाणून घ्यायचे होते, त्यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हे निदर्शने करण्यात आले आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. समोर आलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये काही आंदोलक कार्यालयाच्या खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसर्या व्हिडिओमध्ये पोलीस आंदोलकाला घटनास्थळावरून उचलून ताब्यात घेताना दिसत आहेत.काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणाबाबत मोठा निर्णय दिला होता. संरक्षित जंगले, वन्यजीव अभयारण्यांभोवतीचा एक किलोमीटरचा संपूर्ण परिसर इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) असणार आहे, असे त्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते. ईएसझेडच्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. मात्र, केरळमध्ये हा वाद यावरून आहे की, तिथे या नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाली, तर इको-सेन्सिटिव्ह भागात राहणाऱ्या लोकांचे काय होईल, ते कुठे जातील? या मुद्द्यावर एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी वायनाडमध्ये निदर्शने केली आणि राहुल गांधींचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मुद्द्यावर राहुल गांधी आतापर्यंत माध्यमांशी बोलले नसले तरी त्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.त्या पत्रात राहुल गांधींनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वायनाडच्या स्थानिक लोकांची चिंता खूप वाढली आहे. या एका निर्णयामुळे शेतीपासून इतर कामांमध्ये फरक पडणार आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणासोबतच लोकांच्या सोयी आणि त्यांच्या राहणीमानाचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांच्या वतीने पंतप्रधानांना करण्यात आले आहे.