राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात येऊ देणार नाही - अनिल विज
By ravalnath.patil | Published: October 4, 2020 12:28 PM2020-10-04T12:28:10+5:302020-10-04T12:29:32+5:30
Rahul Gandhi :राहुल गांधींच्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप हरयाणामध्ये होणार आहे.
चंदीगड - पंजाबमधील मोगा येथे आज कृषी कायद्याच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पंजाबच्या मोगामध्ये ट्रॅक्टर रॅलीचे नेतृत्व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी करणार आहेत. यावेळी ते स्वत: ट्रॅक्टर चालविणार आहेत.
राहुल गांधींच्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप हरयाणामध्ये होणार आहे. कुरुक्षेत्रमध्ये ही रॅली थांबविण्यात येणार आहे. मात्र राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात प्रवेश करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी घेतली आहे.
काँग्रेस पक्ष आज पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून 'शेती वाचवा' अभियान सुरू करणार आहे. या तीन दिवसीय अभियानाचे नेतृत्व पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान राहुल गांधी स्वत: ट्रॅक्टर चालवतील आणि खेड्यांमधील शेतकऱ्यांना भेटतील. या ट्रॅक्टर रॅलीत सुमारे तीन हजार शेतकरी सहभाग घेणार आहेत.
तीन दिवसांच्या पंजाब दौर्याच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी मोगा जिल्ह्यात असतील. लापोन आणि चाकर या गावात राहुल यांचे शेतकरी स्वागत करतील. तसेच, मानोके गावात सुद्धा या ट्रॅक्टर रॅलीचे स्वागत समारंभ होणार आहे. त्यानंतर या रॅलीचा समारोप लुधियानाच्या जटपुरा येथी एका जाहीर सभेत होणार आहे.
दरम्यान, या रॅलीवरून हरयाणाचे माजी कृषिमंत्री आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष ओपी धनखड़ यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. जर राहुल गांधी यांना राज्यात ट्रॅक्टर रॅली घ्यायची असेल तर त्यांनी रॉबर्ट वड्रा यांनाही बरोबर आणावे, असे ओपी धनखड़ यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, शिरोमणी अकाली दलाने राहुल गांधी यांना दोन प्रश्न विचारले आहेत. एक म्हणजे, ज्यावेळी लोकसभेत कृषी संबंधित तीन बिले सादर केली जात होती, त्यावेळी तुम्ही गैरहजर का होता? आणि दुसरा काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पारंपारिक कृषी उत्पन्न पणन समिती (एपीएमसी) हटविण्याविषयी चर्चा का केली होती? असे सवाल शिरोमणी अकाली दलाने केले आहेत.