आदेश रावल
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला सूर बदलला आहे. राहुल गांधी आता आपल्या भाषणामध्ये गौतम अदानी, चीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्यांवर बोलत नाहीत. कर्नाटकमधील भाजप सरकारचा कथित ४० टक्के भ्रष्टाचार, कन्नड भाषा, नंदिनी दूध, पदवीधरांना ३००० रुपये महिना भत्ता, २०० युनिट मोफत वीज, महिलांना २००० रुपये पेन्शनचा मुद्दा उपस्थित करीत आहेत.
राहुल गांधी यांनी सुरुवातीच्या आपल्या प्रचारात गौतम अदानी मुद्यावर भर देताना म्हटले होते की, मी सत्य बोललो होतो व त्याची किंमत मला चुकवावी लागली. राहुल गांधी यांनी या मुद्यांऐवजी कर्नाटकशी संबंधित मुद्यांवर प्रचार करावा. विधानसभा निवडणुकांत राष्ट्रीय विषयांवर बोलून काहीही उपयोग होत नाही, असे अनेक ज्येष्ठ नेते व त्यांच्या रणनीतीकारांचे म्हणणे होते. ही रणनीती राहुल गांधी यांनी जाणून घेतली व ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे मान्य केले.