नवी दिल्ली, दि. 12 - सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला अहंकार चढला होता. त्यामुळे पराभव झाला हे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे त्यांनी दिलेली मोठी राजकीय कबुली आहे असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. राहुल गांधी यांनी मंगळवारी अमेरिकेतील बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.
या टीकेचा समाचार घेताना स्मृती इराणी म्हणाल्या की, देशात पाठिंबा मिळत नाही, म्हणून राहुल गांधी परदेशातल्या भूमीवर आपल दु:ख, व्यथा सांगत आहेत. घराणेशाही देश चालवते असे राहुल गांधी म्हणतात, पण आपले पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे घराणेशाहीतून आलेले नाहीत याकडे स्मृती इराणींनी लक्ष वेधले.
अमेरिकेत काय म्हणाले राहुल गांधीसंसद व मुख्य आर्थिक सल्लागारांना विचारात न घेता अंमलात आणलेल्या नोटाबंदी व जीएसटीसारख्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे. यामुळे जीडीपीमध्ये घसरण झाल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणालेत. शिवाय, देशात सांप्रदायिक आणि ध्रुवीकरण करणा-या शक्ती डोकं वर काढत असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे. हिंसेमुळे मी माझ्या वडील, आजीला गमावलं आहे. मला माहिली आहे की हिंसेमुळे काय नुकसान होते. कोणत्याही व्यक्तीविरोधात हिंसा होऊ नये. जेव्हा तुम्ही जवळच्या माणसांना गमावता, तेव्हा तुम्हाला खोल जखमा होतात, असेही यावेळी राहुल गांधी म्हणालेत. 'हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अहिंसेच्या विचारांवरच हल्ले सुरू आहेत. अहिंसेमुळेच मानवता जिवंत राहू शकते. मात्र त्याच विचारधारेला लक्ष्य केले जात आहे,' या शब्दांमध्ये राहुल गांधींनी देशातील परिस्थितीवर भाष्य केले.
...तर पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार - राहुल गांधी दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी पहिल्यांदाच म्हटले आहे की, पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे. शिवाय, 2012मध्ये काँग्रेस पक्षामध्ये अहंकार निर्माण झाला होता आणि पक्षानं जनतेशी संवाद कमी केल्याने लोकं दुरावली. लोकांसोबतच संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले वक्ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले वक्ते आहेत, जनतेला कसा संदेश द्यावा? याची त्यांना चांगलीच माहिती आहे. मात्र ते भाजपा नेत्यांचंही कधी ऐकत नाहीत. स्वच्छ भारत एक चांगली कल्पना आहे, मलाही ती आवडली. आज रशिया पाकिस्तानला शस्त्रं विकत आहे, जे याआधी कधीही झाले नाही. नेपाळ, श्रीलंका, मालदीवमध्ये चीनचा दबदबा वाढत आहे. परदेश नीतीमध्ये समतोल राखणं गरजेचं आहे. अमेरिकेसोबत मैत्री करणं गरजेचं आहे मात्र दुस-या देशांसोबतही मैत्री करणं तितकंच गरजेचं आहे.