दारूबंदीसाठी दोन मिनिटांत एक छापा, दोन वर्षांत ताशी सात जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:17 AM2018-04-06T01:17:58+5:302018-04-06T01:17:58+5:30
बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केल्याला दोन वर्षे पूर्ण झाली असून, या काळात पोलिसांनी दारूचे साठे शोधण्यासाठी दर दोन मिनिटांनी एक छापा मारला आणि या गुन्ह्यांसाठी दर तासाला सात जणांना अटक केली.
पाटणा - बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केल्याला दोन वर्षे पूर्ण झाली असून, या काळात पोलिसांनी दारूचे साठे शोधण्यासाठी दर दोन मिनिटांनी एक छापा मारला आणि या गुन्ह्यांसाठी दर तासाला सात जणांना अटक केली. दारूबंदीचे धोरण यशस्वी झाले नसले तरी ते फसलेलेही नाही.
या दोन वर्षांत दारूविक्री करणारे व दारू बाळगणारे अशा ९६ हजार लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दारूविक्री प्रकरणी ४ हजार लोक तुरुंगात आहेत. दारूबंदीनंतर शेजारी राज्यांतून दारू आणणे सुरू झाले. त्याला आळा घालण्यासाठी घातलेल्या छाप्यांत भारतीय बनावटीची विदेशी ब्रँडची दारू तसेच देशी दारू यांचा सुमारे २३ लाख लीटरचा साठा पोलिसांनी जप्त केला. सरकारी वाहनांतून दारूची ने-आण होत असल्याचे अनेक प्रकरणांत उघड झाले. दारूची विक्री होत असल्याचे उघडकीस आल्याने ३६१ पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईही झाली. दारूविक्री प्रकरणी पोलिसांनी ६२ हजार एफआयआर नोंदविले. दारूच्या तस्करीप्रकरणी अन्य राज्यांतील लोकांनाही अटक झाली. दारूबंदीची मागणी राज्यातील महिलांनी केली होती. दारूच्या व्यसनामुळे हिंसाचारातही वाढ झाल्याची तक्रार होती. दारू बाळगणाºया वा विक्री करणाºयाला राज्यात १० वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
गॅस सिलिंडरमध्ये दारू
दारूबंदीमुळे गॅस सिलिंडर, वाहनाच्या चॅसिस, कारच्या लेदर पॅडिंग व चाकांच्या कव्हर्समध्ये दारूसाठा लपविण्याची क्लृप्ती लोकांनी काढली. पोलिसांनी हा डावही हाणून पाडला. गेल्या दोन वर्षांत राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण १८.५ टक्क्यांनी, तर अपघातांचे प्रमाण ३० टक्क्यांंनी कमी झाले आहे.