पियूष जैनच्या घरांवर आजही छापे सुरुच, रोख रकमेसह मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची नाणी आणि बिस्कीट जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 12:21 PM2021-12-26T12:21:54+5:302021-12-26T12:24:18+5:30
अधिकाऱ्यांना पियुष जैनच्या घरात सोन्या-चांदीच्या नाण्यांनी भरलेली पोती आणि पैशांनी भरलेली अनेक कपाटे सापडली आहेत.
कानपूर- कनौज येथील अत्तर व्यापारी पियुष जैन (IT Raid on Piyush Jain) याच्या घरावर जीएसटी इंटेलिजन्स आणि आयकर विभागाचे छापे आजही सुरू आहेत. पियुष जैनच्या घरातून आतापर्यंत 177 कोटींची रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोने, चांदीची नाणी आणि बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. मात्र, या छाप्यात जप्त केलेल्या रकमेला अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही किंवा नाकारला नाही.
पियुष जैनने गूढ पद्धतीने घर बांधले
पियुष जैनच्या मोठ्या संकुलात एकूण चार घरे बांधण्यात आली आहेत. अत्यंत गूढ पद्धतीने बांधलेल्या या घरांमध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण आठ दरवाजे आहेत. यापैकी कोणतेही घर एकमेकांशी जोडलेले नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांना एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी बाहेर पडावे लागते. आतापर्यंत येथून सुमारे चार भरलेल्या गोण्या सापडल्या असून, त्यात नोटा असल्याची चर्चा आहे. सोन्याची नाणी आणि बिस्किटेही मोठ्या प्रमाणात मिळाल्याची चर्चा आहे.
अनेक ठिकाणांवर छापे
पीटीआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या छाप्याच्या काही छायाचित्रांमध्ये व्यापारी पियुष जैनच्या निवासी परिसरात मोठ्या कपाटांमध्ये रोख रकमेचे ढीग दिसत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कानपूर, गुजरात आणि मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. अधिकार्यांनी शहरातील 'शिखर' ब्रँडचा पान मसाला आणि इतर तंबाखू उत्पादनांच्या कारखान्यावरही छापा टाकला आहे.