- विकास झाडेनवी दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटवावे व त्यांना अटक करावी या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी केलेल्या रेल रोको आंदोलनाला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. देशभरात सुमारे दीडशे ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी रेल रोको आंदोलन व निदर्शने केली. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. या आंदोलनामुळे राजस्थान, हरियाणा येथे १८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.लखीमपूर खेरी येथे ३ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या अंगावर वाहने घातल्याचा आरोप आहे. त्यावेळी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले होते. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष याला अटक करण्यात आली आहे. पण, शेतकरी त्यावर समाधानी नाहीत. संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केल्याप्रमाणे सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत रेल रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलकांनी एक्स्प्रेस रोखून धरल्याउत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात गड स्थानकाजवळ रेल्वे रोखून धरणारे आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली. हकीमपूर, मुरादाबाद आदी ठिकाणीही शेतकऱ्यांनी रेल्वेगाड्या रोखून धरल्या होत्या. आंदोलक शेतकऱ्यांनी बिलासपूर रेल्वे स्थानकावर जम्मू तावी-काठगोदाम एक्स्प्रेस तर, बुलंदशहरमधील खुर्जा जंक्शनवर गोमती एक्स्प्रेस रोखून धरली होती. अजय मिश्रा यांना अटक करा; मागणी कायमअजय मिश्रा यांना मंत्री पदावरून हटवा व त्यांना अटक करा अशी त्यांची मागणी आहे. ती केंद्र सरकार मान्य करत नसल्याने संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी देशव्यापी रेल रोको आंदोलन केले. यापुढेही ही मागणी सातत्याने करणार असल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले आहे. कृषी कायद्यांविरुद्ध निघणार मध्य प्रदेशमधून यात्रानवी दिल्ली : केंद्र सरकारने मागच्या वर्षी केलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन पंजाब, हरयाणा आणि दिल्लीतून शेजारच्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्येही पसरले आहे. सध्या त्याचे स्वरूप लहान आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाने भोपाळजवळील होशंगाबाद येथून ९ हजार किलोमीटर मोर्चा सुरू करण्याची घोषणा केली आहे.शेतकऱ्यांसाठी बरेच काही केले आहे, अशी मध्य प्रदेशची प्रतिमा असली, तरी पेरणीचा हंगाम सुरू झाल्यावर निर्माण झालेल्या खतटंचाईवरून शेतकरी नाराज आहेत.
शेतकऱ्यांच्या ‘रेल रोको’ला संमिश्र प्रतिसाद; दीडशे ठिकाणी निदर्शने; अनेक रेल्वेंची वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 6:34 AM