लखनऊ : लखनऊच्या एका कार्यक्रमाला आलेल्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत माघारी पाठविले. शिव्या आणि धक्काबुक्कीमुळे कार्यक्रमामध्ये गोंधळ माजला होता. गोयल यांच्या कार्यालयाकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे.
रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे संघटना कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी गोयल यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. यानंतर जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. यादरम्यान गोयल यांच्यावर एका कर्मचाऱ्याने कुंडी भिरकावली. यामुळे त्यांना छोटी जखमही झाली. काही वेळ ते डोके धरून होते. यामध्ये सुरक्षारक्षक पंकज शुक्ला हे देखील जखमी झाले.
रेल्वे मंत्री गोयल एका रेल्वे स्टेडिअममध्ये कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आले होते. मात्र, भाषणावेळी त्यांनी रेल्वे युनियनबाबत वक्तव्य केल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरले आणि धक्काबुक्की केली. युनियन कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे. तरुणांना चुकीच्या रस्त्यावर नेत आहे. यानंतर तेथे गोंधळ झाला. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. धक्काबुक्कीत गोयल यांनाही मारहाण झाल्याचे समजते. यानंतर गोयल यांना तेथून हाकलून देण्यात आले. फोटोंमध्ये गोयल पळताना दिसत आहेत.
दरम्यान, गोयल यांच्या कार्यालयाकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्याचे किंवा गोयल यांना मारहाण झाली नसल्याचे म्हटले आहे.