नवी दिल्ली - रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवास करताना अनेकदा काही कारणांमुळे ट्रेन उशिराने धावत असतात. मात्र आता या त्रासातून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. प्रवाशांना आता ट्रेनची सर्व माहिती मिळणार आहे. भारतीय रेल्वेने ट्रेनच्या इंजिनला 'इस्रो'च्या उपग्रहांशी जोडले आहे. त्यामुळे उपग्रहांच्या माध्यमातून आता लवकरच ट्रेनचे सर्वप्रकारचे अपडेट मिळण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये संबंधित ट्रेनच्या येण्याची, जाण्याची वेळ, ट्रेनची नेमकी स्थिती समजण्यास मदत होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे नववर्षात नवीन सुरुवात करणार आहे. ट्रेनच्या येण्या-जाण्याची माहिती देण्याबरोबरच ती माहिती कंट्रोल चार्टमध्ये नोंदविण्यासाठी इस्त्रोच्या उपग्रहांमधील 'रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टीम'चा (आरटीआयएस) उपयोग करण्यात येणार आहे. 'आरटीआयएस' प्रणाली आठ जानेवारीला वैष्णोदेवी-कटरा- वांद्रे टर्मिनस, नवी दिल्ली-पाटणा, नवी दिल्ली-अमृतसर आणि नवी दिल्ली ते जम्मू या मार्गांवरील काही एक्स्प्रेसमध्ये बसविण्यात आली आहे.
नव्या प्रणालीमुळे रेल्वेला आपल्या नेटवर्कमध्ये धावणाऱ्या ट्रेनच्या संचलनासाठी नियंत्रण कक्षाचे आधुनिकीकरण करणे शक्य होणार आहे. या शिवाय रेल्वेच्या परिचालनातही सुधारणा करणे शक्य होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 'इस्रो'द्वारा विकसित करण्यात आलेल्या 'आरटीआयएस'युक्त उपकरणाला 'गगन जिओ पोझिशनिंग सिस्टीम'च्या मदतीने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे धावणाऱ्या गाड्या आणि त्यांचे ठिकाण यांची खात्रीशीर माहिती मिळवणे शक्य होणार आहे.
रेल्वेमधील कॅटरिंग सेवेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याआधी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वेमधून प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचं बिल मिळालं नाही तर ते जेवण मोफत असणार आहे. मार्च महिन्यापासून रेल्वेमधील जेवणाच्या किंमतींचे तक्ते रेल्वेसह स्टेशनवर सर्व प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने लावले जाणार आहेत. विशेष म्हणजे या तक्त्यावर ‘कृपया टीप देऊ नका, जर बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण मोफत असणार आहे’ असा महत्त्वाचा संदेश लिहिलेला असणार आहे.