जमशेदपूर : मुंबईहून हावडाला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या थर्ड एसी कोचची चाके नादुरुस्त झाल्याचे कळूनही रेल्वे अधिकाऱ्यांनी ही एक्स्प्रेस चक्क 200 किमी चालविली. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. अधिकाऱ्यांचा मोठा हलगर्जीपणा उघड झाला आहे.
मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकातून सुटलेली हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस टाटानगर स्थानकावर आली असता थर्ड एसी डब्यातील प्रवाशांनी सततच्या मोठ्या आवाजामुळे त्रस्त झाल्याने गोंधळ घातला. मात्र, तो डबा न बदलताच ही रेल्वे हावडापर्यंत चालविण्यात आली. हे अंतर 200 किमी आहे. केवळ रेल्वे चालकाला वेग कमी ठेवण्यास सांगण्यात आले.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनुसार सीएसएमटीहून सुटल्यानंतर एक्स्प्रेस सोमवारी 2.55 मिनिटांनी टाटनगरला पोहोचायला हवी होती. मात्र, ही ट्रेन दहा तास उशिराने पोहोचली. ही ट्रेन वेगात महालीमुरुम स्टेशनवरून गेल्यानंतर काहीतरी बिघाडा झाल्याची माहिती चक्रधरपूर परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. यावेळी थर्ड एसीच्या बी 1 कोचच्या चाकामध्ये गडबड असल्याचे समजू शकले आणि ट्रेन कधीही रुळांवरून घसरू शकते. यानंतर लगेचच टाटानगरच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. दुरुस्त करणारे कर्मचारी टाटानरगला ट्रेन पोहोचायच्या आत पोहोचले होते.
तपासणीनंतर कोचला कापण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामध्ये 45 मिनिटे गेली. यावेळी टाटानगरला येणारी इतर ट्रेन बाजुला थांबविण्यात आली होती. ही संख्या वाढत होती. याचा दबावही रेल्वे अधिकाऱ्यांवर होता. यामुळे हावडा ट्रेनला नादुरुस्त चाकावरच हावड्याला पाठविण्यात आले. हे समजल्यानंतर कोचमधील प्रवाशांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. मात्र, रेल्वेने त्यांच्या सुरक्षेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले.