हिमाचल, पंजाब, काश्मिरात पावसाचा कहर, उत्तर भारतात मुसळधार पावसाचे ११ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:51 AM2018-09-25T04:51:19+5:302018-09-25T04:51:41+5:30
हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, उत्तराखंड या राज्यांत पावसाचा कहर सुरू असून, अनेक ठिकाणी दरडीही कोसळत आहेत. उत्तर भारतात या पावसाने ११ बळी घेतले आहेत.
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, उत्तराखंड या राज्यांत पावसाचा कहर सुरू असून, अनेक ठिकाणी दरडीही कोसळत आहेत. उत्तर भारतात या पावसाने ११ बळी घेतले आहेत. २४ तासांत अरुणाचल प्रदेश, आसाम,मेघालय, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उत्तर भारतात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली व हिमाचल प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे.
हिमाचलच्या अनेक भागात मुसळधार पावसाने आलेल्या नद्यांना आलेल्या पुरात एक इसमाचा आणि एका मुलीचा मृत्यू झाला. कुल्लू जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रवासी बस, ट्रकसह अनेक वाहनेही पुरात वाहून गेली आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर काही पुरात वाहून गेली आहेत. पावसाचा जोर असतानाच रोहतांग पाससह अनेक भागांत आताच बर्फवृष्टी सुरू झाली आहे.
कुल्लू जिल्ह्यात रविवारी डोबी येथे अचानक आलेल्या पुरानंतर हवाई दलाच्या जवानांनी १९ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. राज्याच्या ८ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कांगडा, चंबा, मंडी जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रावी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. डोंगरी भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. चंबा जिल्ह्यात २४ तासात १८० मिमी पाऊस झाला. काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून सोमवारी २९ जणांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या.
पंजाबात रेड अलर्ट
चंदीगड : पंजाबमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार
पाऊस होत असून राज्य सरकारने सोमवारी रेड अलर्ट जारी केला आहे.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बेठक घेतली.
आपत्कालिन स्थिती ओढावल्यास सैन्याला तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.