काश्मीरमध्ये पावसाचे थैमान; पूरपरिस्थितीमुळे सतर्कतेच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:12 AM2018-07-01T00:12:06+5:302018-07-01T00:12:28+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये सतत दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने झेलमसह इतर सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, काश्मीर खोऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सतत दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने झेलमसह इतर सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, काश्मीर खोऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ही पूरस्थिती लक्षात घेत प्रशासनाने जिल्हा यंत्रणांना दक्षतेच्या सूचना दिल्या असून, प्रसंगी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा व लष्कराला तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काश्मीर खोºयातील सर्व शैक्षणिक संस्थांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली असून, राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी सर्व अधिकाºयांची घाईघाईने बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जिल्हा प्रशासनाना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. झेलम नदीची पातळी शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात २३ फुटांवर गेली होती. झेलमसह अनेक नद्यांचे पाणी लोकांच्या घरांत व जवळच्या गावांमध्ये शिरले आहे.
या परिस्थितीमुळे काश्मिरात आलेल्या पर्यटकांनाही हॉटलांबाहेर पडू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच सर्व नद्यांच्या ठिकाणी पोलीस व सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
श्रीनगरच्या सखल भागांत राहणाºया लोकांना दक्ष राहण्याच्या व प्रसंगी स्थलांतराची तयारी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे श्रीनगरचे उपायुक्त सय्यद अबिद रशीद शाह यांनी सांगितले. गेले तीन दिवस पडणाºया पावसाने श्रीनगरसह अनेक शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (वृत्तसंस्था)
- 2014 साली काश्मिरात भयानक पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये ३00 लोक मृत्युमुखी पडले होते. त्याशिवाय मोठी वित्तहानीही झाली होती. त्यातून लोक पूर्णपणे सावरले असतानाच, पुन्हा तशी स्थिती दिसू लागल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
अमरनाथ यात्रा स्थगित
सततच्या पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबविली आहे. पावसामुळे अनेक भागांत दरडी कोसळण्याची शक्यता असून, चिखलामुळे चालणेही अशक्य होत आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रेकरूंना उत्तर काश्मीरच्या बालटाल व दक्षिण काश्मीरच्या पहलगामच्या पुढे जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाने सर्व भाविकांना दोन शिबिरांमध्ये सुरक्षित ठेवले आहे. तिथे त्यांच्या जेवणाची, तसेच औषधोपचारांचीही व्यवस्था केली आहे. काश्मीरमधील परिस्थिती पाहता शाळा बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.