Raj Thackeray Ayodhya Visit: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा ५ जूनला प्रस्तावित आहे. या मुद्द्याला काहींनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी विरोध केला आहे. महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वाने राज यांच्या भूमिकेबाबत थेट भूमिका मांडलेली नाही. पण उत्तर प्रदेशातीलभाजपाचे बृजभूषण यांनी राज ठाकरेंनाउत्तर प्रदेशात येऊन देणार नसल्याची भूमिका मांडली आहे. तशातच आता भाजपाचा रालोआ आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने देखील राज यांच्या आयोध्या दौऱ्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जद(यू) कडून राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध नाही, पण त्यांनी एक मागणी केली आहे. ती मागणी पूर्ण झाल्यास राज यांचे उत्तर प्रदेशात स्वागत करू अन्यथा ते इथे कसे येतात तेच बघू, असा इशारा जद(यू) ने दिला आहे.
जनता दल युनायटेडचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे. "जद(यू) राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याच्या विरोधात नाही. पण उत्तर भारतीयांच्या बाबत राज यांनी जो पवित्रा घेतला होता, त्याचा आम्ही विरोध करतो. महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मनसेने बसू दिलं नव्हतं. काही विद्यार्थ्यांना मारहाणदेखील झाली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना त्यावेळी मध्ये पडावं लागलं होतं. टॅक्सी आणि रिक्षावाल्यांना महाराष्ट्रात मारहाण झाली. छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनाही मनसेने विरोध केला होता. राज ठाकरेंनी या सर्व घटनांबद्दल माफी मागितली पाहिजे. त्यांची त्यावेळची भूमिका चुकीची होती, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. तसं न केल्यास ते अयोध्येचा दौरा करण्याची हिंमतच कशी करतात, ते पाहूया. कारण ते उत्तर भारतीयांचे पहिल्या क्रमांकाचे शत्रू आहेत", अशा शब्दांत केसी त्यागींनी राज यांच्यावर टीका केली.
भाजपाचे खासदार बृजभूषण यांनीही केलाय विरोध
''मी म्हणतो की राज ठाकरे उंदीर आहे. ते बिळात राहातात. त्या बिळातून बाहेर येत नाहीत. आत्तापर्यंत ते बाहेर आले नाहीत. पहिल्यांदाच ते हा दौरा करणार आहेत. त्यामुळे मी विरोध करत आहे. मी ठरवलं आहे की ५ तारखेला त्यांना उत्तर प्रदेशच्या धरतीवर घुसू देणार नाही. मी म्हटलंय म्हणजे घुसू देणारच नाही,'' अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.