Narendra Modi : "3 डिसेंबरला काँग्रेस होणार छू मंतर, राजस्थानमधून अशोक गेहलोतांचं जाणं निश्चित"; मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 02:26 PM2023-11-18T14:26:22+5:302023-11-18T14:41:47+5:30
Narendra Modi : काँग्रेसने राजस्थानला मागे ढकललं आहे. राजस्थानच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी येथे भाजपा आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरतपूरमध्ये जनतेला संबोधित केलं. काँग्रेसने राजस्थानला मागे ढकललं आहे. राजस्थानच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी येथे भाजपा आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले. "राजस्थानमध्ये आता एक आठवड्यानंतर मतदान होणार आहे. सर्वत्र भाजपा सरकार असाच आवाज ऐकू येत आहे. काही लोक स्वतःला जादूगार म्हणत आहेत पण आता राजस्थानचे लोक 3 डिसेंबरला काँग्रेस छू मंतर होणार असल्याचं म्हणत आहेत" असंही मोदींनी सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "भाजपाने राजस्थानमध्ये एक जबरदस्त जाहीरनामा जारी केला आहे. राजस्थान हे देशातील आघाडीचे राज्य बनवण्याचा भाजपाचा संकल्प आहे. राजस्थानमध्ये भ्रष्टाचारावर जोरदार प्रहार करण्याचा भाजपचा संकल्प आहे. बहिणी-मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा भाजपाचा संकल्प आहे. राजस्थान भाजपाने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तुम्हाला दिलेली ही आश्वासने नक्कीच पूर्ण होतील, हे मोदीचं आश्वासन आहे."
"एकीकडे भारत जगात अग्रेसर होत आहे. दुसरीकडे, राजस्थानमध्ये गेल्या 5 वर्षांत काय घडलं हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. काँग्रेसने राजस्थानला भ्रष्टाचार, दंगली आणि गुन्ह्यांमध्ये आघाडीवर नेलं. प्रत्येक नागरिकाच्या जीवाचं व मालमत्तेचं रक्षण करणं ही काँग्रेस सरकारची जबाबदारी होती. मात्र गेल्या पाच वर्षात बहिणी, मुली, दलित आणि वंचितांवर सर्वाधिक गुन्हे आणि अत्याचार झाले आहेत."
"होळी असो, रामनवमी असो किंवा हनुमान जयंती असो, तुम्ही लोक कोणताही सण शांततेने साजरा करू शकत नाही. दंगल, दगडफेक, संचारबंदी, हे सर्व राजस्थानात सुरूच होते. जिथे जिथे काँग्रेस येते तिथे दहशतवादी, गुन्हेगार आणि दंगल आहे. काँग्रेसनेही राजस्थानच्या महिलांच्या विश्वासाला तडा दिला आहे. महिला बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करतात असं जे मुख्यमंत्री सांगत आहेत ते महिलांचं रक्षण कसं करू शकतात?, अशा मुख्यमंत्र्याला एक मिनिटही खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का?" असा सवाल देखील पंतप्रधान मोदींनी विचारला आहे.