Condolence Letter : जगात प्रत्येक आई-बाप आपल्या मुलाबाळांना मोठं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. पालक आपल्या मुलांच्या छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करण्यात आपले संपूर्ण आयुष्य घालवतात. पण काही मुलं मुली आपल्या हट्टापायी पालकांना कायमचं दुःखी करुन सोडतात. अशीच काहीशी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. मुलीचे कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याबद्दल वडिलांचा राग इतका वाढला की त्यांनी आपल्या हयात असलेल्या मुलीच्या श्राद्धासाठी शोक पत्रिका छापल्याचा प्रकार समोर आला आहे.
राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील रतनपुरा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध, मुलीने प्रेमासाठी लग्न केले. यामुळे दुखावलेल्या वडिलांनी स्वतःच्या मुलीच्या श्राद्धासाठी शोक पत्रिका छापली आहे. ११ डिसेंबर रोजी हे विधी करण्यात येणार आहे. ही शोकपत्रिका आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीने शेजारील दंथाळ गावातील मुलाशी प्रेमापोटी लग्न केले, जे मुलीच्या कुटुंबाला पसंत नव्हते. आपल्या मुलीच्या निर्णयामुळे तिचे वडील इतके दुखावले गेले की त्यांनी आपल्या हयात असलेल्या मुलीचे शोक पत्रिकाच छापली. एवढेच नाही तर १३ जून रोजी श्राद्धासाठी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
व्यवसायाने ट्रकचालक असलेल्या मुलीच्या वडिलांनी सांगितले की, "मी माझ्या मुलीचे मोठ्या अपेक्षेने शिक्षण पूर्ण केले होते. बीए केल्यानंतर ती सध्या बीएड पदवीचे शिक्षण घेत आहे. मुलीने शिक्षिका व्हावे असे आमचे स्वप्न होते, पण प्रेमापोटी तिने लग्न केले. यामुळे आम्ही पती-पत्नी खूप दुखावलो आहोत. भविष्यात अशी घटना कोणत्याही पालकासोबत घडू नये."
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी कोणतीही तक्रार आली नसून रतनपूर गावातील एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलीचे त्याच तरुणाशी लावले होते, ज्याच्यासोबत त्या मुलीने प्रेमविवाह केला आहे. या लग्नाआधी दोन्ही कुटुंबात वाद झाला आणि काही महिन्यांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी कांडा गावातील दुसऱ्या मुलासोबत तिचे लग्न लावून दिले होते. १७ मे रोजी मुलीच्या आईने हमीरगड पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर १ जून रोजी बेपत्ता मुलगी तिच्या पतीसह पोलिसांकडे पोहोचली आणि तिने आपण अल्पवयीन नसल्याचे पुरावे दिले.
दरम्यान, पोलिसांकडे गेल्यानंतर मुलीने पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. पोलिसांनी मुलीच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावले होते. मात्र मुलीने त्यांना ओळख दाखण्यासही नकार दिला. त्यानंतर मुलीला पतीसोबत जाण्याची परवानगी देण्यात आली.