ह्दयद्रावक! प्यायला पाणी न मिळाल्यानं ६ वर्षाच्या मुलीचा दुदैवी अंत; रखरखत्या उन्हात २५ किमी पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 12:56 PM2021-06-08T12:56:49+5:302021-06-08T12:58:44+5:30
राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील रानीवाडा येथील परिसरात रविवारी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. ४५ डीग्री तापमानात ही मुलगी तिच्या आजीसोबत प्रवास करत होती.
जालौर – सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत जगातील विकसित देशांसोबत स्पर्धेत आहे. आधुनिक आणि आत्मनिर्भर भारत असा दावा करताना दुसरीकडे काही अशा घटना समोर येतात ज्यांनी शरमेने मान खाली जाते. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यात अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. जिथं रखरखत्या उन्हात प्रवास करणाऱ्या ६ वर्षीय मुलीचा पाणी न मिळाल्यानं मृत्यू झाला आहे. मुलगी तिच्या आजीसोबत होती. आजीही बेशुद्ध पडली.
राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील रानीवाडा येथील परिसरात रविवारी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. ४५ डीग्री तापमानात ही मुलगी तिच्या आजीसोबत प्रवास करत होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वृद्ध आजीला पाणी पाजलं आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तर चिमुकलीचा मृतदेह हॉस्पिटलला पाठवण्यात आला. त्याठिकाणी पोस्टमोर्टम केले असता पाणी न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं कारण उघड झालं.
पायपीट करून प्रवास का करत होते?
माहितीनुसार, ६० वर्षीय सुखी देवी तिची नात अंजलीसह सिरोहीजवळील रायपूरहून दुपारी रानीवाडा परिसरातील डुंगरी येथे तिच्या घरी येत होती. कोरोना काळात वाहनांची ये-जा कमी असल्याने तिला घरी येण्यासाठी कोणतंही साधन मिळालं नाही. त्यामुळे आजी नातीला घेऊन चालतच तिच्या गावाच्या दिशेने निघाली. जवळपास २०-२५ किमी चालल्यानंतर दोघांची अवस्था बिकट झाली. त्यांना थकवा आला. वाळवंटाच्या क्षेत्रात त्या दोघींना तहान लागली होती. पाणी न मिळाल्याने रोडा गावाजवळ अंजलीचा मृत्यू झाला. तर सुखी देवी बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. कोरोना काळ आणि गरमीचे दिवस असल्याने खूप वेळ याठिकाणाहून कोणी आलं-गेलं नाही. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी कोणीच येऊ शकलं नाही. पोस्टमोर्टमनंतर मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला.
केंद्रीय मंत्र्याचा काँग्रेसवर निशाणा
पिण्याचं पाणी न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे परंतु आता या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून काँग्रेस सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ९ तास पिण्याचं पाणी न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. हे लज्जास्पद आहे. राजस्थान सरकार यासाठी जबाबदार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आता गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.