जयपूर- राजस्थानचे आरोग्य मंत्री कालीचरण सराफ यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कालीचरण सराफ रस्त्याच्या बाजूला लघुशंका करताना दिसत आहेत. या घटनेबद्दल त्यांना विचारल असता, ही घटना मोठी नसल्याचं त्यांनी म्हंटलं.
एकीकडे जयपूर नगर निगम शहराला स्वच्छ भारत अभियाना टॉपवर आणण्यासाठी मेहनत घेतली जात असताना दुसरीकडे आरोग्य मंत्री कालीचरण सराफ यांचा फोटो व्हायरल झाल्याने टीका होते आहे. नियमांनुसार, जर एखादी व्यक्ती रस्त्याच्यावर लघुशंका करताना पकडली गेली तर त्यांना 200 रूपयांचा दंड आकारला जाईल. मीडियाने जेव्हा कालीदास सराफ यांच्याकडे या संदर्भात प्रतिक्रिया मागितली तेव्हा त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. हे प्रकरण अजिबात मोठं नाही, असं उडवाउडवीचं उत्तर त्यांनी दिलं. राजस्थानचे आरोग्य मंत्री कालीदास सराफ यांच्या या कृत्यावर राजस्थान काँग्रेसने कडाडून टीका केली आहे. राजस्थान काँग्रेसच्या उपाध्यक्षा अर्चना शर्मा यांनी म्हंटलं की, स्वच्छ भारत अभियानासाठी इतका पैसा खर्च केला जातो आहे. यामुळे नेत्यांच्या अशा लाजिरवाण्या कृत्यामुळे चुकीचा संदेश जातो. हेच मंत्री त्यांच्या मतदार संघात असं कधीही करणार नाहीत.
कोटा जिल्ह्याचे ओबीसी विंग प्रमुख अशोक चौधरी यांनी दोन दिवसांआधी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहिल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. वसुंधरा राजे यांच्या कार्यप्रणालीने जनता खुश नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी वसुंधरा राजे आणि राज्याचे पक्षप्रमुख अशोक परनामी यांना हटविण्याची मागणी केली आहे.