Rajasthan News: एखाद्या व्यक्तीच्या शरीरात काही थेंब विष गेले, तरी त्याच्या जीवावर बेतू शकते. पण, राजस्थानच्या पालीमधून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथील एका शेतकऱ्याच्या पोटात एक दोन नव्हे, तर तब्बल अर्धा लिटरहून अधिक विष गेले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्या शेतकऱ्याचा जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी त्याच्या शेतात पिकांवर कीटकनाशक फवारत होता. यावेळी चुकून कीटकनाशक त्याच्या शरीरात गेले. यामुळे तो आजारी पडला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. हे कीटकनाशक इतके विषारी होते की, त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
5000 इंजेक्शन दिलेशेतकऱ्याच्या शरीरात 600 एमएल कीटकनाशक गेले होते. त्याच्या जगण्याची शक्यता फार कमी होती. पण डॉक्टरांनी धीर सोडला नाही. पेशंटचे प्राण वाचवण्यात त्यांनी मोठे प्रयत्न केले. 24 दिवस रुग्णाला 5000 इंजेक्शन देण्यात आले आणि त्याचा जीव वाचवला. आता हा शेतकरी पूर्णपणे बरा झाला आहे.
असे वाचवले प्राण...रुग्णाला श्वासही घेता येत नव्हता, त्यामुळे डॉ. प्रवीण गर्ग यांच्या टीमने सर्वप्रथम रुग्णाच्या गळ्यात छिद्र करुन त्याला ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अँटीडोट औषध एट्रोपीनचे इंजेक्शन देण्यास सुरुवात केली. रुग्णाला दररोज 208 इंजेक्शन देण्यात आले. जेणेकरून विषाचा प्रभाव संपुष्टात येईल. यासोबतच रुग्णाला औषधेही सुरुच होती.
रुग्णाला 24 दिवस डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली रुग्णालयात ठेवण्यात आले. हळूहळू रुग्णाची प्रकृती सुधारली. त्यानंतर 24 दिवसांनी रुग्ण पूर्णपणे निरोगी झाला. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. यापूर्वी अमेरिकेतही अशीच एक घटना समोर आली होती. येथे 300 मिली कीटकनाशक एका व्यक्तीच्या शरीरात गेले होते. त्याला आठ दिवस 760 इंजेक्शन देण्यात आले.