'पद्मावत'विरोधात शोले स्टाईल आंदोलन ! पेट्रोल घेऊन 350 फूट उंच मोबाइल टॉवर चढला तरुण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 05:06 PM2018-01-22T17:06:20+5:302018-01-22T17:12:48+5:30
सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरही पद्मावत सिनेमासंदर्भातील वाद संपत नाहीयत. राजस्थानच्या भीलवाडा परिसरातून एक नवीन प्रकरण समोर आले आहे.
नवी दिल्ली - सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरही पद्मावत सिनेमासंदर्भातील वाद संपत नाहीयत. राजस्थानच्या भीलवाडा परिसरातून एक नवीन प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एक तरुण पेट्रोल घेऊन 350 फूट उंच मोबाइल टॉवरवर चढला असून त्यानं भलतीच अट स्थानिक प्रशासनासमोर ठेवली आहे. जोपर्यंत पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर संपूर्ण देशात बंदी लादण्यात येत नाही, तोपर्यंत या मोबाइल टॉवरवरुन उतरणार नाही, अशी निराळीच अट त्यानं ठेवली आहे. दरम्यान, 25 जानेवारीला पद्मावत सिनेमा संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे.
भीलवाडा जिल्हा प्रशासन आणि पोलीस घटनास्थळवर पोहोचले असून या तरुणाला समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हा तरुण आपल्या मागणीवर ठाम आहे. पद्मावतच्या प्रदर्शनावर संपूर्ण देशात बंदी आणावी, अन्यथा येथेच आत्महदन करेन,असा इशारा त्यानं दिला आहे. या घटनेमुळे प्रशासनाची घाबरगुंडी उडाली आहे.
A youth has climbed a 350 feet tall mobile tower with a bottle of petrol in Bhilwara; the protester is saying 'will come down only when #Padmaavat is banned in the country' #Rajasthanpic.twitter.com/h65ctfbWq1
— ANI (@ANI) January 22, 2018
करणी सेनेच्या धमकीनंतरही 'पद्मावत'साठी होतेय जोरदार ऑनलाइन बुकींग
'पद्मावत' सिनेमासंदर्भातील वाद संपुष्टात येण्याचं नावच घेत नाहीयत. 25 जानेवारीला हा सिनेमा देशभरात बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सुप्रीम कोर्टानं सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवलेला असतानाही गुजरात आणि राजस्थानमध्ये या अद्यापही तीव्र निदर्शनं सुरूच आहेत. अशातच सिनेमा पाहण्यापासून वंचित राहिले जाऊ नये, यासाठी सिनेचाहत्यांनी पद्मावत सिनेमाचं ऑनलाइन तिकीट बुक करण्यास सुरुवात केली आहे. एकूण चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसहीत अन्य राज्यांमध्येही ऑनलाइन तिकीट बुकींग करण्यात येत आहे.
एकीकडे 'पद्मावत' सिनेमाला तीव्र विरोध जरी दर्शवण्यात येत असला तर दुसरीकडे चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पद्मावत सिनेमाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सिनेमासाठीच्या अॅडवान्स्ड बुकींगसाठी लिंक शेअर करण्यात आली आहे आणि चाहत्यांना सिनेमा रिलीजच्या एक दिवस आधीच पहिल्या दिवसाचा शो बुक करण्यासंबंधची माहिती पुरवण्यात आली आहे. पद्मावत सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित 'पद्मावत' सिनेमावर बंदी घालण्यासंदर्भातील राजस्थान व मध्य प्रदेश सरकारकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी (23 जानेवारी) सुनावणी होणार आहे. 'पद्मावत' सिनेमा बॉक्सऑफिसवर रिलीज करण्याच्या निर्णयावर तातडीनं बंदी घालण्यात यावी, कारण हा सिनेमामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचं दोन्ही राज्यांचं म्हणणं आहे.
'पद्मावत'च्या रिलीजवर बंदी आणण्यासाठी राजस्थान-मध्य प्रदेश सरकारची याचिका
करणी सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राजस्थानचे गृहमंत्री कटारिया यांनी सांगितले होते की, सर्वसामान्य जनतेच्या भावना जपाव्यात, असे सरकारचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे, कायदा सुव्यवस्था राखण्यात अडचणी निर्माण झाल्यास राज्य सरकारला सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याचा अधिकार देण्यात यावा, कारण सिनेमामुळे शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे, असे सांगत मध्य प्रदेश सरकारनं पद्मावतवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याचा अधिकार राज्य सरकारला कायद्यानुसार असल्याचंही मध्य प्रदेश सरकारनं सांगितले आहे. मात्र यापूर्वी झालेल्या 18 जानेवारीला झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं चार राज्यांमध्ये 'पद्मावत' सिनेमावर लावण्यात आलेल्या बंदीच्या निर्णयावर स्थगिती आणली होती.