election results today : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. तेलंगणा वगळता तीन राज्यांमध्ये भाजपाने चांगले यश मिळवले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांतील विधानसभा निवडणूक म्हणजे लोकसभा २०२४ ची सेमी फायनल. आतापर्यंतच्या आकडेवारीनूसार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये सत्ताबदल होण्याची चिन्हं असून काँग्रेसची सत्ता जाण्याची दाट शक्यता आहे. राजस्थानच्या जनतेने आपली परंपरा राखत सत्ताबदल केला आणि विरोक्षी पक्षाकडे सत्तेची चावी सोपवली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निकालावर भाष्य करताना म्हटले, "मी नेहमीच सांगत आलो आहे की, मी जनतेचा जनादेश स्वीकारेन आणि भविष्यातील सरकारला माझ्या शुभेच्छा देतो. मला आशा आहे की ते राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी पुढील सरकार काम करेल. विधानसभा निवडणुकीचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे."
राजस्थानातील १९९ विधानसभेच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. भारतीय जनता पक्ष ११५ जागांसह आघाडीवर आहे, तर सत्ताधारी काँग्रेस ७० जागांसह पिछाडीवर आहे. तर बीएसपी (२) आणि इतर जागांवर (१२) उमेदवार आघाडीवर आहेत. राजस्थानच्या जनतेने परंपरा कायम राखत सत्ताबदल करण्यासाठी कौल दिला.
दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने निवडणुकीसाठी तिकीट वाटप करताना कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मात्र जाहीर केला नाही. पंरतु, २०१८मध्ये भाजपाने मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. परिणामी तिन्ही राज्यात भाजपाचा पराभव झाला. मात्र यावेळी भाजपाने तसे केले नाही. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करणं टाळलं. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने निवडणूक लढवली आणि त्याचा मोठा परिणामही दिसून येत आहे.